किन्हाळाच्या युवकाने चाैदा एकरात फुलविली विविध प्रकारच्या भाजीपाल्याची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 05:00 AM2021-09-06T05:00:00+5:302021-09-06T05:00:35+5:30
तानाजी या तरुणास शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला आहे. ज्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली ती शेती देसाईगंज येथील एका व्यापाऱ्याची आहे. तानाजीने ती भाड्याने घेतली आहे. या भाड्याच्या शेतात त्याने ठिबक सिंचन व्यवस्था केली. पाच हाॅर्सपाॅवरचा मोटारपंप लावला. गादी वाफ्यांवर प्लास्टिक मलचींग लावली. संपूर्णपणे शेणखत वापरले. किड लागू नये म्हणून शेतातच दशपर्णी औषधी तयार करून फवारणी करणे सुरू आहे.
अरविंद घुटके
लाेकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला (किन्हाळा) : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला व लागूनच असलेली गावे भाजीपाला लागवडीकरीता प्रसिद्ध आहेत. उन्हाळी भाजीपाला लागवड येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु भर पावसाळ्यात भाजीपाला उत्पादनाकरिता पाण्याचा योग्य निचरा हाेणारी शेतजमीन आवश्यक आहे. अशी जमीन या भागात नसल्याने पावसाळ्यात भाजीपाल्याची फारशी लागवड होत नाही. मात्र, किन्हाळा येथील तानाजी ठाकरे या ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने पावसाळ्यात तब्बल चौदा एकरात कारले, चवळीशेंग, मुंगना, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांची लागवड करून परिसरातीलच नव्हे तर अन्य शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह, चैतन्य व प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य केले आहे.
तानाजी या तरुणास शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला आहे. ज्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली ती शेती देसाईगंज येथील एका व्यापाऱ्याची आहे. तानाजीने ती भाड्याने घेतली आहे. या भाड्याच्या शेतात त्याने ठिबक सिंचन व्यवस्था केली. पाच हाॅर्सपाॅवरचा मोटारपंप लावला. गादी वाफ्यांवर प्लास्टिक मलचींग लावली. संपूर्णपणे शेणखत वापरले. किड लागू नये म्हणून शेतातच दशपर्णी औषधी तयार करून फवारणी करणे सुरू आहे. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात पीक घेणे सुरू असल्याने या भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. परंतु कारले आणि चवळीशेंगांचे दर कमी असल्याने अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत त्याने लोकमतजवळ व्यक्त केली. कारले आणि चवळीशेंगा वेलीकरीता मांडवपद्धती वापरली आहे. दर दोन दिवसाला चवळीशेंगा पाच क्विंटल तर दर आठवड्याला वीस ते पंचवीस क्विंटल कारल्याचे उत्पादन हाेत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. अन्य भाजीपाल्यामधूनही पैसे येणे सुरू आहे. या संपूर्ण लागवडीकरीता व शेतात अन्य सुविधा निर्माण करण्याकरीता आतापर्यंत एकूण आठ ते नऊ लाख रुपये खर्च झाले.
शेतात लावले सीसीटीव्ही कॅमेरे
शेतात अतिशय चांगल्या दर्जाचा भाजीपाला आहे. तसेच शेतात अत्याधुनिक पद्धतीची यंत्रे आहेत. ही यंत्रे चाेरून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहित्य व भाजीपाला चाेरीला जाऊ नये यासाठी तानाजी यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे ते जिल्ह्यातील पहिले शेतकरी असावेत. चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील शेतात लावले आहेत.
पाच लाखांचा भाजीपाला विकला; पुन्हा ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा
आजवर एकूण पाच लाख रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री झाली. अजून चार ते पाच महिने उत्पन्न देण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे. येणाऱ्या दिवसात योग्य भाव मिळाला तर ३० ते ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, अशी भावना तानाजी ठाकरे यांनी बोलून दाखविली. शेतीवर नवनवीन प्रयोग करणे हा तानाजी यांचा छंदच आहे. त्याचे कार्य गडचिराेली जिल्ह्यातील इतर बेराेजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.