दुर्गम भागातील युवकांना मिळाले मधुमक्षिका पालनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:55+5:302021-08-15T04:37:55+5:30

मधुमक्षिका पालन प्रशिक्षणादरम्यान युवकांना मधमाशांचे प्रकार, मध संकलन, मधाचे पॅकेजिंग, मधाची विक्री आदींची माहिती देऊन त्यांना पिलारी चंद्रपूर व ...

Young people in remote areas get beekeeping lessons | दुर्गम भागातील युवकांना मिळाले मधुमक्षिका पालनाचे धडे

दुर्गम भागातील युवकांना मिळाले मधुमक्षिका पालनाचे धडे

googlenewsNext

मधुमक्षिका पालन प्रशिक्षणादरम्यान युवकांना मधमाशांचे प्रकार, मध संकलन, मधाचे पॅकेजिंग, मधाची विक्री आदींची माहिती देऊन त्यांना पिलारी चंद्रपूर व आनंदवन वरोरा आदी ठिकाणी प्रत्यक्ष नेऊन मधुमक्षिका पालनाचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणांतर्गत शेतकऱ्यांना मधमाशी पालन करून शेतीचे उत्पादन, मध मेण, राॅयल, जेली अशा प्रकारचे उत्पादन घेता येते. साेबत मधमाशी पालन करून २० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढविता येते. या अनुषंगाने हे प्रशिक्षण देण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून अपर पाेलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर, प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पुष्पक बाेथीकर उपस्थित हाेते.

अपर पाेलीस अधीक्षक शेख यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रोत्साहन देऊन त्यांना भविष्यात आवश्यक मदत करणार असल्याचे सांगितले. डाॅ. किशाेर मानकर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना वनविभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन मधमाशी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन करण्याची हमी दिली. कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी प्रशिक्षणार्थी युवकांना मधुमक्षिका पालन करण्यास प्रोत्साहन देऊन त्यामार्फत रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र, बॅग, पुस्तक, मधमाशी पालन संरक्षक काेट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आयसीएआर अटारी पुणे व केंद्रिय मधमाशी केंद्र यांच्या अंतर्गत घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गृहविज्ञान विषय विशेषज्ज्ञ नीलिमा पाटील तर आभार पीक संरक्षण विषय विशेषज्ज्ञ पुष्पक बाेथीकर यांनी मानले.

बाॅक्स

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३५ युवतींना ब्युटी पार्लर, २५ युवकांना मत्स्य पालन, ६७ युवकांना शेळीपालन, ३५ युवतींना लेडीज टेलर अशा एकूण १९७ युवक-युवतींना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापुढे देखील पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी दिली.

Web Title: Young people in remote areas get beekeeping lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.