मुंबई-औरंगाबादचे तरुण पोलीस भरतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:23 AM2018-03-10T01:23:07+5:302018-03-10T01:23:07+5:30
राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत. केवळ विदर्भातील जिल्ह्यांमधूनच नाही तर चक्क मुंबई, औरंगाबाद, अहमदनगरपासूनच्या युवकांनी या भरतीसाठी गडचिरोली गाठले आहे. बेरोजगारीच्या वनव्यापुढे नक्षलवाद्यांची दहशत काहीच नाही, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
अवघ्या १२९ पदांसाठी तब्बल २८ हजार १७० बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असली तरी अनेक युवक पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक, डीएड्, बीएड् झालेलेसुद्धा आहेत. शुक्रवार दि.९ पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी आपला शारीरिक चाचणीसाठी नंबर लागेल म्हणून अनेक युवक कालपासूनच गडचिरोलीत आले होते. पण आज त्यांचा नंबर लागला नाही. उद्याही लागेल की नाही माहीत नाही. पुन्हा शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झाल्यास लेखी चाचणीपर्यंत थांबावे लागणार आहे. एवढे दिवस हॉटेल, लॉजवर थांबण्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अनेक युवकांनी चक्क पोलीस मुख्यालयाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखालीच आश्रय घेतल्याचे दिसून आले. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मैदानालगत मोठे शेड आहे, पण तिथे थांबण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे झाडाखालीच अंग टेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे या युवकांनी सांगितले.
पहिल्या दिवशी एक हजार युवकांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्याचे नियोजन केले होते. मात्र ९४ युवक गैरहजर होते. उपस्थित ९०६ जणांपैकी उंचीत ४० जण, छातीत ४२ जण तर उंच उडी, १०० मीटर दौड, १००० मीटर दौड, गोळाफेक आणि लांब उडी या मैदानी चाचण्यांत ४१ जण अपात्र ठरले. त्यामुळे एकूण ७१६ जण पहिल्या दिवशीच्या चाचणीत पात्र ठरले आहेत.
पहाटे ५ वाजतापासून सुरूवात
दुपारच्या वेळी ऊन वाढत असल्यामुळे आणि शक्य तितक्या लवकर शारीरिक क्षमता चाचणी आटोपावी म्हणून पहाटे ५ वाजतापासूनच शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी सांगितले. तरीही पहिल्या दिवशी ९०६ जणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी ३ वाजले. शनिवारपासून दररोज दिड हजार युवकांची चाचणी घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्चशिक्षित युवकही मैदानात
या भरतीसाठी गडचिरोलीत दाखल झालेला औरंगाबादच्या सागर चव्हाण हा बीएससी अंतिम वर्षाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे गडचिरोलीत संधी मिळेल या आशेने आल्याचे तो म्हणाला. मुंबईचा निलेश अप्पाबाजारे हा बीए तृतीय वर्षाला शिकत आहे. अहमदनगरचा प्रवीण ढाकणे बीकॉम झाला आहे. औढा नागनाथचा शेख अजगर बीए, डीएड् झाला आहे. शिक्षक म्हणून नोकरी लागत नसल्यामुळे पोलीस विभागात प्रयत्न करतोय असे त्याने सांगितले. याशिवाय परळी वैजनाथचा नितीन प्रभू ढवारे हा बीए झालेला युवकही नशिब आजमावतो आहे. नोकरी नसल्यामुळे ऊस तोडणी करायला जातो. त्यापेक्षा पोलिसाची नोकरी चांगलीच असल्याचे तो म्हणाला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेत ४०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देत असल्यास गडचिरोली पोलीस दलाच्या भरती हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रभारी अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.