पप्पा, घरी चाललेय.. म्हणणारी साहिली जगच सोडून गेली, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By दिलीप दहेलकर | Published: March 20, 2023 03:09 PM2023-03-20T15:09:44+5:302023-03-20T15:12:57+5:30

तो संवाद ठरला अखेरचा : अभियंता तरुणीच्या आत्महत्येचे गूढ कायम, झाशीनगरवर शोककळा

young woman from gadchiroli commits suicide by hanging in pune | पप्पा, घरी चाललेय.. म्हणणारी साहिली जगच सोडून गेली, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पप्पा, घरी चाललेय.. म्हणणारी साहिली जगच सोडून गेली, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

googlenewsNext

गडचिरोली : लहानपणापासून शिक्षणात हुशार असलेली ती अभियंता झाली अन् खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली होती. मैत्रिणींसोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लेकीला वडिलांनी फोन केला तेव्हा पप्पा, दूध आणण्यासाठी बाहेर आलेय..घरी जाऊन चहा पिणार आहे, असे ती म्हटली होती, परंतु फ्लॅटकडे जाते म्हणून निघालेली लेक ही जगच सोडून गेल्याचा फोन दुसऱ्या दिवशी वडिलांना आला अन् कुटुंब शोकसागरात बुडाले. शहरातील साहिली वासुदेव बट्टे (२४, रा. झाशीनगर, चंद्रपूररोड) या उच्चशिक्षित तरुणीच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे.

भाजप नेते वासुदेव बट्टे व माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांना एक मुलगा व एक मुलगी. साहिली ही त्यांचीच मुलगी. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातील कारमेल हायस्कूलमध्ये झाले. दहावीत तिने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून ती गुणवत्ता यादीत झळकली होती. पुढील शिक्षणासाठी ती हैदराबादला गेली. बारावीतही तिनं प्रावीण्यश्रेणीत स्थान मिळविले. त्यानंतर साहिली हिने पुणे येथे अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले. तिचा भाऊ चैतन्य हादेखील पुण्यात शिकतो. मात्र, दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहत.

दीड वर्षांपासून साहिली पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. हिंजवडी भागात मैत्रिणींसह ती फ्लॅटमध्ये राहायची. आठवड्यातून दाेन दिवस ती प्रत्यक्ष कंपनीच्या कार्यालयात जाऊन काम करीत हाेती, इतर दिवशी घरूनच काम करायची. तीन आठवड्यांपूर्वी ती गडचिरोलीला आली होती. आई-वडिलांना भेटून पुन्हा पुण्याला परतली होती. १७ मार्च रोजी भावाशी व्हिडिओ कॉल करून ती बोलली होती.

१८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वडिलांनी तिला फोन करून ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आई व वडील दोघेही तिच्याशी फोनवर बोलले. पप्पा मी दूध पॉकेट घेण्यासाठी बाहेर आले आहे, घरी जाऊन चहा पिणार आहे, हा त्यांच्यातील शेवटचा संवाद असेल याची कुटुंबीयांनाही कल्पना नव्हती. रात्री साडेनऊ वाजेनंतर तिने फ्लॅटमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, तिच्या मैत्रिणींनी वारंवार फोन करूनही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर फ्लॅटमध्ये तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.  या घटनेने गडचिरोलीत झाशीनगर येथील निवासस्थानी नातेवाईकांनी गर्दी केली होती. परिसरातही शोककळा पसरली.

गुणी लेक होती हो....

अभ्यासात गुणी असलेली साहिली घरात लाडकी होती. पहिल्याच जॉबमध्ये तिला चांगला पगार मिळाला होता. दोन वर्षांचा करार संपल्यावर तिला मोठ्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा होती. मात्र, त्याआधीच तिने स्वत:ला संपविले.

तिच्या आत्महत्येने कुटुंबीयाला धक्का बसला आहे. खूप गुणी लेक होती हो.. असे म्हणत वडिलांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Web Title: young woman from gadchiroli commits suicide by hanging in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.