वीज तारेच्या स्पर्शाने युवक व नीलगाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:25 PM2018-03-01T23:25:42+5:302018-03-01T23:25:42+5:30
वैरागड-आरमोरी मार्गावर असलेल्या वैरागडपासून चार किमी अंतरावरील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया वन तलावात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावून ठेवलेल्या जीवंत विद्युत तारेला स्पर्श ....
ऑनलाईन लोकमत
वैरागड : वैरागड-आरमोरी मार्गावर असलेल्या वैरागडपासून चार किमी अंतरावरील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया वन तलावात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावून ठेवलेल्या जीवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एक युवक व निलगाय ठार झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजता घडली.
सुभाष दिलीप गावतुरे (३०) रा. चिचोली, ता. धानोरा असे मृतकाचे नाव आहे. मृतक सुभाष गावतुरे व एकल विद्यालयात काम करणारे इतर पाच कर्मचारी बैठकीसाठी धानोरावरून वैरागड मार्गे ब्रह्मपुरी येथे दुचाकीने जात होते. सुभाषला शौचास लागल्याने तो तलावात शौचास गेला होता. यावेळी त्याचा सोबती शिवरतन वट्टी हा दुचाकीजवळ थांबला होता. सुभाषला तलावात निलगाय मरण पावली असल्याची दिसली. त्याला कुतूहल वाटल्याने निलगाय बघण्यासाठी सुभाषने त्याचा मित्र वट्टी याला फोन करून मृत पावलेली निलगाय बघण्यासाठी येण्यास सांगितले व सुभाष हा पुढे निघून गेला. मृत पावलेल्या प्राण्याजवळ पोहोचताच सुभाषला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने सुभाष हा तडफडू लागला. काही वेळातच सुभाषचा मृत्यू झाला. त्याच्या मागेच निलगाय पाहण्यासाठी गेलेल्या शिवरतनच्या ही बाब लक्षात आली. शिवरतनने याबाबतची माहिती इतर मित्रांना फोनवरून दिली. इतरत्र तारा विखुरल्या असल्याने शिवरतनचाही नाईलाज झाला. तरीही समयसूचकता दाखवत वीज तारा दूर केल्या. सुभाषला पाणी पाजले. मात्र तोपर्यंत सुभाष हा गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच वैरागड येथील विद्युत कंपनीचे कनिष्ठ अभियंता भोवरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून विद्युत पुरवठा बंद केला. वासाळा बिटाचे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी. वनरक्षक एच. जी. झोडगे, श्रीकांत सेलोटे, बोपचे, आरमोरी पोलीस निरिक्षक महेश पाटील, वैरागडचे बिट जमादार जे. एस. शेंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह आरमोरी येथे पाठविण्यात आला आहे. शिकाºयांनी लाकडाच्या खुंट्या गाडून विद्युत तारा लावल्या होत्या. वन विभागाच्या अंदाजानुसार निलगाय सुध्दा सकाळी ८ वाजताच्या ठार झाली असावी.
ज्या ठिकाणी पाण्याचा साठा असतो, अशा ठिकाणी विद्युत तारा लावून अवैध शिकारीचे अघोरी कृत्य केले जाते. उन्हाळभर या ठिकाणी पाण्याचा साठा असतो. अशा जलस्त्रोताजवळ छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना तयार केली जात आहे. वीज तार लावणाºयांची माहिती देणाºयास बक्षीस देऊन शिकाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या जातील..
- पी. एम. गोडबोले,
उपवनसंरक्षक वन विभाग, वडसा