लघुशंकेसाठी उठला अन् झोपी गेला; सर्पदंशाने पहाटे युवकाचा मृत्यू
By गेापाल लाजुरकर | Published: August 13, 2023 06:59 PM2023-08-13T18:59:40+5:302023-08-13T18:59:54+5:30
जुनी वडसातील घटना : मध्यरात्री मण्यार सापाचा चावा
गडचिरोली : मध्यरात्री लघुशंकेसाठी उठलेल्या तरुणाला पायाला काहीतरी दंश झाल्यासारखे जाणवले; परंतु दुर्लक्ष करून तो झोपी गेला. मात्र, काही मिनिटातच त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्या तरूणाला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले; उपचार सुरू असतानाच पहाटे ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. ही घटना जुनी वडसा येथे १३ ऑगस्ट रोजी घडली.
अनिकेत खंडाळे (२६) रा. चव्हाण वॉर्ड जुनी वडसा, असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अनिकेत खंडाळे हा शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास लघु शंकेसाठी उठला. बाहेर त्याच्या पायाला काहीतरी दंश झाल्याचे जाणवले. परंतु त्याने याकडे दुर्लक्ष केले व झोपी गेला; परंतु काही वेळेतच त्याची प्रकृती बिघडू लागली. श्वास घेण्यासाठी त्रास हाेऊ लागला. ही बाब कुटुंबीयांना कळताच त्यांनी अनिकेतला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. विष संपूर्ण शरीरात पसरल्याने प्रकृती खालावली व पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. अनिकेतच्या मृत्यूनंतर घरीच चाैकशी केली असता मण्यार साप आढळून आला.
कुटुंबाचा आधार हिरावला
अनिकेत हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचा विवाह झाला हाेता. त्याच्या पश्चात पत्नी व परिवार आहे. ताे घरातील कमावता व्यक्ती हाेता. कुटुंबातील कमावती व्यक्ती कायमची निघून गेल्याने कुटुंबावर माेठा आघात झाला. त्यामुळे खंडाळे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांनी केली.