Gadchiroli | मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात युवकाचा बुडून मृत्यू; कुरखेड्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 03:54 PM2022-09-17T15:54:34+5:302022-09-17T15:56:31+5:30
एकाला वाचविण्यात दुसऱ्याचा गेला जीव
कुरखेडा (गडचिरोली) : गावातील महिलेचे अंत्यसंस्कार आटाेपून सती नदीत बांधलेल्या बंधाऱ्यावरून परत येत असताना मित्राचा पाय घसरून ताे बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात उतरलेल्या दुसऱ्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १६ सप्टेंबर राेजी दुपारी १ वाजता घडली.
चेतन मधुकर सलामे (वय २२, रा. मोहगाव, वाकडी) असे मृृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कुरखेडा शहरातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने त्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चेतन आपल्या मित्रांसह सती नदी घाटावर गेला होता. अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर पाच-सहा मित्र नदी पुलावरून परत न येता पात्रात असलेल्या बंधाऱ्यावरून येण्याचा प्रयत्न करीत हाेते. सदर बंधाऱ्यावरून पाणी वाहत हाेते. दरम्यान, पाय घसरून बंधाऱ्याजवळील खोल खड्ड्यातील पाण्यात एक युवक बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी चेतन सलामे पाण्यात उतरला.
त्या युवकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चेतन सुद्धा बुडू लागला. यावेळी इतर युवकांनी हातांची साखळी तयार करून पहिल्या युवकाला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा जीव वाचला; मात्र चेतनला वाचविण्यासाठी थाेडा उशीर झाल्याने ताे पाण्यात बुडाला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला.