मिळगुळवंचा येथील युवकांना पोलिसांकडून मारहाण
By admin | Published: May 18, 2016 01:31 AM2016-05-18T01:31:44+5:302016-05-18T01:31:44+5:30
कोठी व नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलीस जवानांनी मंगळवारी तालुक्यातील मिळगुळवंचा येथील चार युवकांना
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : कोठी व नारगुंडा पोलिसांवर आरोप
गडचिरोली : कोठी व नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलीस जवानांनी मंगळवारी तालुक्यातील मिळगुळवंचा येथील चार युवकांना मारहाण केल्याची तक्रार मिळगुळवंचा येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पोलीस मदत केंद्र कोठी व नारगुंडा येथील पोलीस १६ मे रोजी सकाळी ८ वाजता गावात आले. ढोल वाजवून सर्व गावकऱ्यांना जमा केले व सभा घेतली. १७ मे रोजी सर्व गावकऱ्यांना पोलीस मदत केंद्र कोठी येथे उपस्थित राहण्यास बजाविले. पेका मादी पुंगाटी हा युवक आपल्या शेतात तेंदूची पाने तोडत असताना त्याला मारहाण करून पोलिसांनी कोठी मदत केंद्रात नेले. त्यांच्याबरोबरच गावकरीही पोलीस मदत केंद्रावर पोहोचले. पोलिसांनी पेका मादी पुंगाटी व चुक्कू मादी पुंगाटी याला आतमध्ये नेऊन बेदम मारहाण केली व नंतर किशोर बिका दुर्वा, सरजु पेका पुंगाटी व अमर चैतू नरोटी यांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली. नक्षलवादी तुमच्या गावात येतात. त्याला तुम्ही जेवन देता, नक्षलवाद्यांचे कपडे घालून मारून टाकू, असे मारहाण करतेवेळी म्हणत होते. मारहाणीमुळे चुक्कू पुंगाटी याची प्रकृती चिंताजनक आहे. तो बोलू शकत नाही. त्यामुळे त्याला उपचारासाठी लोकबिरादरी प्रकल्पात दाखल करण्यात आले आहे. पेका मादी पुंगाटी हा सध्या पोलिसांच्याच ताब्यात आहे. पोलिसांच्या या अत्याचारी प्रवृत्तीमुळे गावकरी दहशतीत आहेत. तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला असतानाही ते घराबाहेर पडू शकत नाही. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करून शासनाप्रती विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी निवेदनातून झुरू मादी पुंगाटी, सरजू पेका पुंगाटी, ऋषी झुरू पुंगाटी, चैतू पेका नरोटी, अमर चैतू नरोटी, कोपा दसरू दुर्वा, अशोक भिवा दुर्वा, किशोर भिका दुर्वा, राजू कोमटी मट्टामी यांनी केली आहे. मारहाण झालेल्यांमध्ये सरजू पेका पुंगाटी व किशोर पेका दुर्वा हे अकराव्या वर्गात भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा भामरागड येथे शिकत आहे. तर अमर नरोटी हा कोठी येथे शिकत आहे.
पेका पुंगाटीचा बंडू वाचामीच्या हत्येत हात
नक्षल्यांनी हत्या केलेल्या पोलीस कर्मचारी बंडू वाचामी यांना पेका मादी पुंगाटी याने नक्षल्यांना पकडून दिले आहे. या कामासाठी अजून दोन व्यक्तींनी मदत केली आहे. त्यामुळे पेका मादी पुंगाटी याच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती भामरागड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चौधरी यांनी लोकमतला दिली.