नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले

By संजय तिपाले | Published: November 25, 2023 01:39 PM2023-11-25T13:39:00+5:302023-11-25T13:42:35+5:30

महिनाभरात तीन हत्या: पोलिसांचा खबऱ्या असल्याचा पत्रकात दावा

youth killed by Naxalites in aheri tehsil, third incident in a month | नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले

नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले

गडचिरोली : पोलिसांचा खबरी असल्याचा संशयावरुन नक्षल्यांनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. ही खळबळजनक घटना २४ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. दरम्यान, २३ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यात पोलिस पाटलाची हत्या केली होती. या घटनेनंतर २४ तासांतच तरुणास संपविले. महिनाभरात तिघांना नक्षल्यांनी बंदुकीचा निशाणा बनविल्याने जिल्हा हादरुन गेला आहे.

रामजी आत्राम (२७, रा. कापेवंचा ता. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी आढळलेल्या नक्षल पत्रकात तो खबऱ्या असल्याचा दावा केला आहे. २४ नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापेवंचा येथे रामजी आत्राम हा शेतात काम करीत होता. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्याठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रामजीची हत्या केल्याचा दावा नक्षल्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात केला आहे. तर तो खबरी नव्हता असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांनी तिघांची हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा आणि काल शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम या तरुणाची हत्या केली. हत्येनंतर माओवादी एरिया कमिटी अहेरी या नावाने घटनास्थळी पत्रक सोडण्यात आले आहे.

तोडगट्टा आंदोलन उधळल्यानंतर नक्षली आक्रमक

तोडगट्टा (ता.एटापल्ली) येथील २५० दिवसांपासून सुरु असलेले खाणविरोधी आंदोलन पोलिसांशी झालेल्या वादानंतर उधळून लावण्यात आले.  त्यामुळे नक्षलवादी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.  मागील दोन वर्षांपासून शांत असलेले नक्षलवादी पुन्हा आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: youth killed by Naxalites in aheri tehsil, third incident in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.