युवकाला रानभाजीचा मोह नडला; वाघाने हिरावला वृद्ध मातेचा एकमेव आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:25 PM2022-06-27T13:25:43+5:302022-06-27T13:43:21+5:30
मित्राला किशाेरचा केवळ ‘आई’ असे म्हटल्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा त्या दिशेने ताे गेला असता काहीच दिसले नाही.
गडचिराेली : गावापासून अवघ्या १ किमी अंतरावर असलेल्या जंगलात रानभाजी आणण्यासाठी मित्रासाेबत गेलेल्या युवकावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना रविवारी सकाळी ७:३० च्या सुमारास तालुक्यातील पाेर्ला येथे घडली. गावालगतच्या झुडपात वाघाने युवकाचा बळी घेतला.
किशाेर तुळशीदास मामीडवार (३०, रा. पाेर्ला टाेली) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. किशाेर हा आपल्या एका मित्रासह रविवारी सकाळी ६:३० च्या सुमारास गावालगतच्या खांबाडा तलाव परिसरात प्रात:विधीसाठी गेला हाेता. परतताना त्यांना परिसराच्या जंगलातील रानभाजी ताेडण्याची इच्छा झाली. दाेघेही तलाव परिसराच्या झुडपी जंगलातून कुड्याची फुले व शेरडिरे ही रानभाजी ताेडत असतानाच वाघाने किशाेरवर हल्ला केला. याचवेळी त्याचा दुसरा मित्र ५०-६० मीटर अंतरावर हाेता. मित्राला किशाेरचा केवळ ‘आई’ असे म्हटल्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा त्या दिशेने ताे गेला असता काहीच दिसले नाही.
परिसरात केवळ वाघाच्या पाऊलखुणा हाेत्या. भीतीने गांगरलेल्या मित्राने लगेच गाव गाठले व लाेकांना याबाबत माहिती दिली. लाेकांनी वनाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली व परिसरात शाेधमाेहीम राबविली असता किशाेर मृतावस्थेत आढळला. त्याच्या उजव्या पायाचा काही भाग वाघाने खाल्ला हाेता. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पाेलिसांच्या मदतीने पंचनामा केला.
सहा महिन्यात सात बळी
गडचिराेली जिल्ह्यात २०२२ मध्ये आतापर्यंत सहा महिन्यांत वाघांनी ७ लाेकांचा बळी घेतला. पहिली घटना २० जानेवारी राेजी कुरंझा येथे घडली. त्यानंतर कुरूड, उसेगाव, अरसाेडा, आरमाेरी, इंजेवारी येथे घडली. आता वाघाने सातवा बळी पाेर्ला येथील युवकाचा घेतला.