युवांनी जाणली काश्मिरची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:37 PM2017-12-06T23:37:54+5:302017-12-06T23:38:11+5:30
सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहावे आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
अहेरी : सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहावे आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले. २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत या विद्यार्थ्यांची सहल जम्मू काश्मिर येथे नेण्यात आली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध माहिती जाणून घेतली.
आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भागातील युवा वर्गाला देशातील कला, संस्कृती व क्षेत्राबाबत माहिती व्हावी, भाषा, चालीरिती, बोलीभाषा याबाबत ज्ञान व्हावे व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या हेतूने सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत भामरागड तालुक्यासह जिल्ह्यातून एकूण ३९ युवक- युवती सहलीत सहभागी झाल्या. सहलीदरम्यान विविध माहिती जाणल्यानंतर परत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अहेरीत समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना, द्वितीय कमान अधिकारी पी. एस. धपोला, बी. के. शर्मा, उपकमांडंट राकेश कुमार, संजय कुमार पुनिया, प्रदीप राणा, बी. सी. रॉय, सहायक कमांडंट राजकुमार व सीआरपीएफचे अधिकारी, जवान उपस्थित होते.
दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील युवक- युवतींनी जीवनात उत्तम मार्ग पत्करून आपल्या भविष्यासह समाजाचा विकास करण्याच्या हेतूने काम करावे, असे आवाहन कमांडंट श्रीराम मीना यांनी केले. यावेळी युवक- युवती उपस्थित होते.