चौकशीसाठी नेताना युवक पोलिसांच्या ताब्यातून पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:01 AM2018-03-05T00:01:54+5:302018-03-05T00:01:54+5:30
चार दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेला तवेटोला येथील हनुमान उसेंडी हा १८ वर्षीय युवक तेव्हापासून गायब आहे.
ऑनलाईन लोकमत
मुरूमगाव : चार दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेला तवेटोला येथील हनुमान उसेंडी हा १८ वर्षीय युवक तेव्हापासून गायब आहे. त्याला सोडण्याच्या मागणीसाठी रविवारी परिसरातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली व नंतर पोलिसांकडे विचारणा केली असता तो आमच्या ताब्यात नसून त्याच दिवशी पळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या घटनेतील रहस्य आणखी वाढले असून पोलीस व गावकरीही त्याचा शोध घेत आहेत.
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती उपपोलीस ठाण्याच्या पथकाने हनुमान उसेंडी या युवकाला संशयावरून १ मार्चला ताब्यात घेतले होते. त्याला चौकशीसाठी नेले जात होते. मात्र मार्गात नक्षल्यांची चाहूल लागल्यानंतर तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेल्याचे केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ कुडवे यांनी रविवारी गावकऱ्यांना सांगितले. मात्र याबाबतची माहिती नसलेल्या परिसरातील गावकऱ्यांनी रविवारी ग्रामसभा घेतली. त्यानंतर ते सर्वजण पोलीस मदत केंद्रात गेले आणि हनुमानबद्दल पोलिसांना विचारणा केली. पण पोलिसांच्या उत्तराने नातेवाईक आणि गावकरी चक्रावले.
यावेळी गावातील मोहन मडावी, परमेश लोहमबरे, मनुराम उइके, भावसिंग तुलावी व अनेक लोक उपस्थित होते. तत्पूर्वी सभेला कोरची पंचायत समितीचे सभापती श्रावण मातलाम, रामदास अकालू उसेंडी, जसवंती उसेंडी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘ते’ कुटुंबीय सुरक्षित
गडचिरोली : कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या भटमऱ्यान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जण बेपत्ता आहेत. मात्र ते सुरक्षित असून नक्षल्यांच्या भितीमुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.