अंगावरून रेल्वे मालगाडी जाऊनही बचावला युवक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 08:09 PM2019-12-10T20:09:48+5:302019-12-10T20:09:54+5:30
रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणा-या रिकाम्या जागेतून दुस-या प्लॅटफॉर्मवर जाताना अचानक रेल्वे सुरू झाली
देसाईगंज (गडचिरोली) : रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणा-या रिकाम्या जागेतून दुस-या प्लॅटफॉर्मवर जाताना अचानक रेल्वे सुरू झाली अन् संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून पुढे निघून गेली. तरीही त्या युवकाला थोडी जखमही झाली नाही. हृदयाचे ठोके चुकविणारी ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी वडसा रेल्वे स्थानकावर घडली.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवासी उडाणपुलावरून न जाता शॉर्टकट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कधीकधी हा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील सर्व प्रवाशांनी अनुभवला.
फलाट क्रमांक १ वर गोंदियाला जाणारी पॅसेंजर तर फलाट क्रमांक २ वर गोंदिया-बल्लारशहा डेमो उभी होती. तिस-या फलाटावर रेल्वेगाडी उभी होती. पॅसेंजर पकडण्यासाठी तीन युवकांनी मालगाडीच्या दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन तरूण रेल्वेडब्यांना जोडणा-या जोडांवर उभे झाले. त्यामुळे तिस-या युवकाने जॉइंटच्या खालच्या बाजूने जाऊन रूळ पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मालगाडी सुरू झाल्याने दोन डब्यांच्या जोडावर उभे असलेल्या युवकांनी कसेतरी फलाटावर उड्या मारून स्वत:चे प्राण वाचविले, मात्र खालून जाणा-या युवकापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. यावेळी त्या युवकाने समयसूचकता दाखवत क्षणाचाही विलंब न करता दोन रूळांच्या मध्ये समांतर झोपला. यामुळे मालगाडीचे अनेक डबे त्याच्या अंगावरून धडधडत पुढे निघून गेले. मात्र त्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही. मालगाडी निघून गेल्यानंतर भयभित झालेल्या युवकाने रेल्वे स्थानकावरून पळ काढला. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. हा चित्तथरारक प्रसंग काही रेल्वेप्रवाशांनी मोबाईलच्या कॅमे-यात कैद केला.
उड्डाणपुलाचा वापर करा
फलाट ओलांडण्यासाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविले आहेत. मात्र अनेक वेळा प्रवाशी त्याचा वापर न करता खालूनच रेल्वे रुळावरून पलिकडे जातात. परिणामी अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. रेल्वे रूळ ओलांडणे बेकायदेशीर आहे. प्रवाशांनी उड्डाण पुलावरूनच फलाट ओलांडावा, असे आवाहन देसाईगंजचे स्टेशनमास्टर संजयकुमार सिंग यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना केले आहे.