झाडीपट्टी रंगभूमी पडली ओस, उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 08:58 PM2020-09-08T20:58:23+5:302020-09-08T21:01:09+5:30
यावर्षी कोरोनाच्या सावटात सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. ओस पडलेल्या ‘झाडीवुड’मुळे हजारोंच्या रोजगारावर गदा आली आहे.
अतुल बुराडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भालाच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातही दरवर्षी हजारो प्रयोग सादर करणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीला १५ ऑगस्टपासून नाटकांच्या तालमीचे वेध लागतात. तेव्हापासून तारखा बुक होण्यास सुरूवात होऊन पुढे दिवाळीपासून हिवाळा संपेपर्यंत गावागावांत विविध नाटकांचे प्रयोग सादर होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पण यावर्षी कोरोनाच्या सावटात सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. ओस पडलेल्या ‘झाडीवुड’मुळे हजारोंच्या रोजगारावर गदा आली आहे.
दिवाळीच्या पाडव्याला नाटकांच्या सादरीकरणास सुरूवात होते, तर दोन ते चार महिन्यांपूर्वीपासूनच पूर्वतयारी, सुनियोजन सुरू होते. मात्र यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंजमध्ये (वडसा) अजून कशालाच सुरूवात नाही. अजून एकाही नाटक कंपनीने आपले कार्यालय उघडले नाही. नाट्य कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर नाटकाची निवड, निर्मिती प्रमुख, दिग्दर्शक, कलावंत, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्थ हे सर्व ठरवावे लागते. त्यासाठी दरवर्षी १५ ऑगस्टला वडसा ते लाखांदूर आणि वडसा ते ब्रम्हपुरी या मार्गाच्या दोन्ही बाजूला नाटक कंपन्यांची कार्यालये उघडली जातात. नाटकांच्या होर्डिंग्जने दोन्ही मार्ग फुलून जातात. गेल्यावर्षी ५५ नाट्य कंपन्यांनी वडसा येथून नाटकांचे बुकिंग केले. यावर्षी मात्र हा मार्ग ओसाड पडला असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.
नाटकांच्या प्रयोगानुसार कलावंत, वादक, गायक, पडद्यामागील कलाकार, वाहन चालक, मालक यांना आपापला मोबदला मिळतो. याशिवाय प्रयोगादरम्यान भरणाऱ्या मंडईमुळे इतरही हजारो लोकांना हंगामी रोजगार मिळतो. मंडईच्या दिवशी रात्रभर गावात नाटक चालते. गावातील प्रत्येक घरातील लोक तिकीट काढून नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी जातात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक उत्सवच असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे गर्दी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. त्यामुळे कित्येक वर्षांची परंपरा असणारी झाडीपट्टी रंगभूमी यावर्षी पहिल्यांदाच अबोल झाली आहे.
महामंडळाच्या सभेत होणार मंथन
कोरोना संसर्गाचा वाढता आलेख पाहता यावर्षी नाटकांचा हंगाम धोक्यात असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नाटकांच्या आयोजनावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. यासोबतच संबंधित सर्वांना मोठ्या आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.९) देसाईगंज येथील अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत यावर्षीच्या हंगामात नाटकप्रयोग आयोजित करायचे किंवा नाही यावर चर्चा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष यशवंत ढोरे तसेच सचिव प्रल्हाद मेश्राम यांनी दिली.