जिल्हा परिषद हायस्कूलला इंग्रजी विषयाचे शिक्षक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:51 PM2024-08-01T16:51:21+5:302024-08-01T16:52:07+5:30
Gadchiroli : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात मागील शैक्षणिक सत्रापासून माध्यमिक विभागाला इंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याने वर्ग ९ वी आणि दहावीच्या अध्यापनावर परिणाम पडत आहे. शिक्षकांअभावी दहावीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार? असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
इंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याने इंग्रजी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून इंग्रजी विषयांचे शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असून या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एटापल्ली येथे स्थानिक व परिसराच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात; परंतु मुख्य इंग्रजी विषयांचे शिक्षक नसल्याने या शाळेत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. जानेवारी महिन्यांपासून इयत्ता ९ वी ते १० वर्गासाठी शिक्षक नसल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे
... तर तासिका तत्त्वावर नियुक्ती करा
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात; परंतु एटापल्ली येथे जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात चक्क इंग्रजी शिक्षक नसल्याने इंग्रजी विषयाची गुणवता माघारणार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ रिक्तपद भरावे, अशी मागणी होत आहे. नियमित शिक्षक शक्य नसल्यास तासिका तत्त्वावर नियुक्त्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.