खिसे तपासणीने जि.प. कर्मचाऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:07 AM2018-05-19T01:07:41+5:302018-05-19T01:07:41+5:30
आरोग्य विभागाच्या पथकाकडून माणसांच्या शारीरिक स्वास्थ्याची तपासणी होतानाचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मात्र शुक्रवारी जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाच्या पथकाकडून इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरोग्य विभागाच्या पथकाकडून माणसांच्या शारीरिक स्वास्थ्याची तपासणी होतानाचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मात्र शुक्रवारी जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाच्या पथकाकडून इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू होती. मात्र या तपासणीने काही कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सरकारी कार्यालये व्यसनमुक्त करण्याच्या उपक्रमाची सुरूवात शुक्रवारी (दि.१८) जिल्हा परिषदेत करण्यात आली. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी, डॉ.विनोद म्हशाखेत्री, याशिवाय आरोग्य विभागातील कर्मचारी आनंद मोडक, नरेंद्र शेंडे, प्रवीण गेडाम आदी मंडळी सकाळी सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर दाखल झाली. बाजुचे प्रवेशद्वार आतून बंद करून केवळ मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आणि कार्यालयात ड्युटीवर येणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खिसे तपासणी सुरू झाली. हा काय प्रकार आहे? असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर त्यांना परिपत्रकाची आठवण करून देत खिशात खर्रा किंवा तंबाखू पुडी आहे का याची तपासणी होत असल्याचे सांगण्यात आले. खिशातील खर्रा-तंबाखू जप्त करून दंडही वसूल केला जात होता. सकाळी ११ वाजेपर्यंत ६५० रुपयांचा दंड वसूल झाला होता.
प्रत्येक कार्यालय तंबाखू व दारूमुक्त करायचे आहे. कर्मचाऱ्यांपासून त्याची सुरूवात करायची आहे. कोणाकडे दोन-चार वेळा तंबाखू-खर्रा आढळल्यास त्याच्यावर प्रशासकीय कारवाई किंवा निलंबनाची कारवाई होऊ शकते.
- डॉ.शशीकांत शंभरकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी