‘जीबी’त जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 01:12 AM2017-06-07T01:12:45+5:302017-06-07T01:12:45+5:30

निवडणूक होऊन नवीन पदाधिकारी विराजमान झाल्यानंतर जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा ७ जून रोजी होणार आहे.

Zip in 'GB' Failure for the office bearers | ‘जीबी’त जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस

‘जीबी’त जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस

Next

आज जिल्हा परिषदेची पहिलीच सभा : अनेक विषयांवर होणार वादळी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणूक होऊन नवीन पदाधिकारी विराजमान झाल्यानंतर जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा ७ जून रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम सभापती वगळता अध्यक्ष व इतर तीन सभापती राजकारणात नवीन आहेत. विरोधी पक्षातील मुरलेल्या राजकारण्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांचा कस लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तीन महिन्यांतून एकदा होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या कामांचे नियोजन केल्या जाते. त्याचबरोबर जिल्हाभरात सुरू असलेल्या कामांविषयी आक्षेप घेण्याचीही संधी विरोधकांना प्राप्त होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार पुरविल्या जातो. मात्र पोषण आहाराचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप अनेक गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात २० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बंद आहेत. किरकोळ दुरूस्तीसाठी या योजना बंद पडून आहेत. जिल्हा परिषदेने योजना दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी जि.प. सदस्यांकडून होण्याची शक्यता आहे. काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. मात्र कमिशनच्या लाभापोटी निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. यावरही वादळी चर्चा होणार आहे.
शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व आठ गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रभारींच्या भरवशावर कामकाज चालविले जात आहे. शैक्षणिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. रिक्त पदे भरण्याविषयीचा ठराव घेतला जाण्याची शक्यता आहे. सेवा ज्येष्ठता यादीतील घोळामुळे शिक्षकांच्या बदल्या सलग दुसऱ्या वर्षीही झाल्या नाही. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी जि.प. सदस्यांकडून लावून धरली जाणार आहे. याशिवाय इतरही प्रश्नांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवीन सदस्यांमध्येही सर्वसाधारण सभेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. बहुतांश जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवीन असले तरी उच्चशिक्षित आहेत. काहींनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापतीपद सुध्दा भुषविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात थोडाफार अनुभव त्यांना सुध्दा आहे. पहिल्या सभेत किमान एकतरी प्रश्न प्रत्येक सदस्यांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचे काम अध्यक्ष व संबंधित सभापतींना करावे लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापतींची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण सभेला हे पदाधिकारी कसे तोंड देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Zip in 'GB' Failure for the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.