राष्ट्रवादीत जि.प. उपाध्यक्ष पदावरून रस्सीखेच
By Admin | Published: March 17, 2017 01:12 AM2017-03-17T01:12:40+5:302017-03-17T01:12:40+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे.
२१ ला मतदान : भाजपसोबत आघाडी झाल्यानंतरही धूसफूस
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. त्यामुळे बहुमताचे २६ संख्याबळ ही आघाडी पूर्ण करण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपाध्यक्ष पदावरून धूसपूस सुरू आहे. ज्येष्ठ जि.प. सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी या पदावर दावा केला आहे. तर राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या जि.प. च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर या ही उपाध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या उपाध्यक्ष पदावरून जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थी संघ व अन्य सदस्य एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप व राष्ट्रवादीची मैत्री झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष पदावरून ताणतणाव सुरू आहे. तिसऱ्यांदा निवडून आलेले जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी उपाध्यक्ष पदावर आपला दावा राहिल, असे सांगितले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसकरिता दोन पदे सोडण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये उपाध्यक्ष पदासह कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाचा समावेश असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लावली जाण्याची शक्यता असल्याने बोरकुटे यांची अडचण होणार आहे. राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांमध्ये आत्रामांच्या बाजुने चार सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत बोरकुटेंना उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे बोरकुटेंना कृषी व पशुसंवर्धन सभापती पद देऊन त्यांचा मान राखला जाईल, असे दिसून येत आहे. यापूर्वीही २००७ ते २०१० या कालावधीत जगन्नाथ बोरकुटे यांनी कृषी व पशुसंवर्धन सभापती पद सांभाळले होते. याशिवाय भाजपला आणखी एका अपक्ष सदस्याचीही गरज आहे. त्यांना भाजप कोणते पद देते याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात सत्ता स्थापनेवरूनही अजुनही फार काही उत्साही हालचाली सुरू असल्याचे चित्र नाही. अलिकडेच चामोर्शी पंचायत समितीच्या निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांच्या गटाकडून निवडून आलेल्या दोन सदस्यांनी काँग्रेसच्या बाजुने मतदान केल्याने गण्यारपवार काँग्रेसच्या खेम्यासोबत जि.प.मध्ये राहतील, असे दिसून येत आहे. मात्र भाजपचे नेते सभागृहात आपले बहुमत २८ पेक्षा कमी राहणार नाही, असा दावा करीत आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती अधांतरी दिसत आहे.
भाजपकडून जि.प. अध्यक्ष पदासाठी चामोर्शी तालुक्यातून निवडून आलेल्या दोन महिला सदस्य दावेदार आहेत. यापैकी कुणाची वर्णी अध्यक्षपदी लागते. याकडे अनेकांचे लक्ष आहे. चामोर्शी तालुक्यालाच अध्यक्ष पद मिळते की आरमोरी विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष पद दिले जाते. याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रालाही एक सभापती पद दिले जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आरमोरी क्षेत्राला एकदाच मिळाले अध्यक्ष पद
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून २४ वर्षात १६ अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळाले. मात्र या संपूर्ण कालखंडात हरिष मने यांच्या रूपाने अध्यक्षपद आरमोरीला मिळाले. मधल्या काही काळात बसीर पटेल कुरेशी हेही कार्यकारी अध्यक्ष झालेत.मोठ्या कालावधीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून आरमोरी विधानसभा क्षेत्रात जि.प. अध्यक्ष पदाची संधी मिळाली नाही.