विद्यार्थ्यांना जि.प. शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:32 AM2018-09-22T00:32:09+5:302018-09-22T00:33:36+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत मेंढाटोला केंद्रात येणाऱ्या कटेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नियमित शाळेत नसल्याच्या मुद्यावर पालकांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत मेंढाटोला केंद्रात येणाऱ्या कटेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नियमित शाळेत नसल्याच्या मुद्यावर पालकांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. जोपर्यंत या शाळेला नियमित शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्धार पालकांनी केला आहे.
कटेझरी येथील जि.प.प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यापैकी एकच शिक्षक नियमित शाळेत असतो. एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळणे व अध्यापन करणे कठीण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनियमित शिक्षकांमुळे अभ्यासक्रम सुध्दा पूर्ण होत नाही. या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार माहिती देऊन सुध्दा कोणतीच कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांसह पालक व ग्रामस्थांनी या शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
या इशाराची दखल घेऊन व विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नसल्याची माहिती मिळताच शुक्रवारी गट शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांनी शाळेला भेट देऊन समितीचे पदाधिकारी व पालकांशी चर्चा केली. नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी प्रभारी व तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक न देता नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी समितीचे पदाधिकारी व पालकांनी केली आहे. जोपर्यंत शिक्षक नियमित शाळेत येणार नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्धार पालकांनी व्यक्त केला. शुक्रवारी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविल्यामुळे शाळा परिसरात शुकशुकाट होता.