अहेरी तालुक्यात फवारणी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 02:02 AM2016-01-08T02:02:48+5:302016-01-08T02:02:48+5:30
मलेरिया, डेंग्यू व अन्य प्राणघातक रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी हिवताप व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यात १ नोव्हेंबर २०१५ पासून औषध फवारणीचे काम सुरू आहे.
मलेरिया निर्मूलनावर भर : महागाव परिसरात फवारणी सुरू
अहेरी : मलेरिया, डेंग्यू व अन्य प्राणघातक रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी हिवताप व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यात १ नोव्हेंबर २०१५ पासून औषध फवारणीचे काम सुरू आहे. हिवताप विभागाच्या फवारणी पथकातर्फे सदर काम गावागावात सुरू आहे.
गडचिरोलीचे जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांच्या आदेशान्वये हंगामी फवारणी पथक अहेरी तालुक्यात दाखल झाले असून कीटकजन्य औषध फवारणीच्या कामाला गती आली आहे. आतापर्यंत तालुक्यातील देचलीपेठा, जिमलगट्टा व कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये फवारणीचे काम पूर्ण झाले आहे. तर तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये फवारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. महागाव केंद्रांतर्गत अहेरीच्या प्राणहिता पोलीस मुख्यालय व सीआरपीएफ बटालीयन ७ च्या निवासस्थानापासून औषध फवारणीचा शुभारंभ करण्यात आला. अहेरी तालुक्यातील मलेरिया पथकातील तांत्रिक पर्यवेक्षक पंकज नैनुरवार यांच्या नेतृत्वात फवारणी सुरू आहे. अहेरी तालुक्यात १०० टक्के फवारणी पूर्ण करण्याचे नियोजन मलेरिया विभागाने केले आहे. या फवारणीच्या कामात आरोग्य विभागासह ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे सहकार्य असणे आवश्यक आहे.
सर्व गावातील नागरिकांनी आपल्या घरात संपूर्ण खोल्यांमध्ये औषध फवारणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)