जि.प. अध्यक्षांनी जाणल्या दुर्गम होड्री परिसरातील समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:33+5:302021-06-16T04:48:33+5:30
भामरागड : तालुका मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या नक्षल प्रभावीत अतिसंवेदनशील होड्री गावकऱ्यांच्या आग्रहाखातर नवीन अंगणवाडी व ग्रामपंचायत भवन ...
भामरागड : तालुका मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या नक्षल प्रभावीत अतिसंवेदनशील होड्री गावकऱ्यांच्या आग्रहाखातर नवीन अंगणवाडी व ग्रामपंचायत भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रस्ता नसल्याने लाहेरीपासून दुचाकी वाहनाने होड्री गाव गाठले. त्यांच्या हस्ते होड्री येथील अंगणवाडी केंद्र व ग्रा.पं. भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत परिसरातील समस्याही जाणून घेतल्या.
यावेळी जि.प. सदस्य अजय नैताम, सुधाकर तिम्मा, लक्ष्मीकांत बोगामी, शामराव येरकलवार, गणेश गोटा, ज्ञानेश्वर भांडेकर, रमेश घोसरे, रोशन वड्डे, सोमा विडपी, सुरेश सिडाम व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील आदिवासी महिलांनी आमच्या आग्रहाला मान देत गावात पोहोचल्यबद्दल त्यांचे आभार वक्त करीत गोटुलमध्ये स्वागत केले.
मागील वर्षी अंगणवाडी व ग्रा.पं. भवनासाठी जि.प.कडे मागणी केली होती. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्यासाठी निधी मंजूर करून दिला. बांधकामही पूर्ण होऊन उद्घाटनाची प्रतीक्षा हाेती. लाहेरीपासून अंतर तीन किमी असून कच्चा रस्ता आहे. मध्ये एक मोठा नाला असल्याने नाल्यातून चारचाकी वाहन जाणे शक्य नव्हते. गावकऱ्यांनी मोटारसायकलने कंकडालवार यांना गावात नेले. सदर गावाचा संपर्क तुटतो. त्यासाठी सदर नाल्यावर नवीन पूल बांधकाम सुरू आहे. आम्ही नेहमीच मतदानाचा हक्क बजावून लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. गेल्या कित्येक निवडणुकींत नेतेमंडळी आम्हाला केवळ आश्वासन देत आहेत. मात्र, काम करत नाहीत. स्थानिक क्षेत्रातून निवडून आलेले नेते याकडे दुर्लक्ष करत असतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.
(बॉक्स)
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
गावाजवळील नाल्यावर विहीर खोदून सौर ऊर्जेवर आधारित मोटार बसवून पाइपलाइनद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कंकडालवार यांनी दिले. गावातील शाळेला भेट देऊन शाळेचे शैक्षणिक वातावरण पाहून मुख्याध्यापक मिच्छा यांचे कौतुक केले. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून पुरेसा निधी देण्याची तयारी आहे, फक्त एक पाऊल पुढे टाकून शासनाच्या विविध विविध योजनांचा फायदा घ्या, असे आवाहन कंकडालवार यांनी ग्रामस्थांना केले.
(बॉक्स)
मूलभूत समस्या कायम
होड्री या गावात आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. मात्र, सदर गावाच्या मूलभूत गरजांची पूर्तता गेल्या अनेक वर्षांत झालेली नाही. या भागात अनेक प्रमुख समस्या कायम आहेत. या परिसरातील होड्रीनंतर लष्कर, गोपणार, आलदंडी, मोरडपार, दिरंग आदी गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत. पूल, वीज नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्या समस्यांकडे गावकऱ्यांनी जि.प. अध्यक्षांचे लक्ष वेधले.
===Photopath===
140621\img-20210613-wa0011.jpg
===Caption===
उद्घाटन करताना व स्वागत करतांना फोटो