जि.प.चे आरक्षण जाहीर

By admin | Published: October 6, 2016 02:05 AM2016-10-06T02:05:41+5:302016-10-06T02:05:41+5:30

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले.

ZP reservation announcement | जि.प.चे आरक्षण जाहीर

जि.प.चे आरक्षण जाहीर

Next

महिलांसाठी २६ जागा राखीव : सोडत पद्धतीने ५१ क्षेत्र घोषित
गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात ५१ जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी ५ मतदारसंघ, त्यापैकी महिलांसाठी ३ मतदारसंघ, अनुसूचित जमातीसाठी २२ मतदारसंघ, त्यापैकी महिलांसाठी ११ मतदारसंघ, नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी १४ मतदारसंघ व त्यातील ७ मतदारसंघ महिलांसाठी, खुल्या प्रवर्गासाठी १० मतदारसंघ, त्यापैकी महिलांसाठी ५ मतदारसंघ राखीव करण्यात आले. नियमाप्रमाणे महिलांना ५० टक्के मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सोडत पध्दतीने जिल्हा परिषदेच्या ५१ जागांचे आरक्षण जाहीर केले. यामध्ये २५ जागा पुरूषांकरिता तर २६ जागा महिलांकरिता निश्चित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय जागांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम असल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी १ वाजतापासून जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात सुरू केली. लहान मुलांच्या हाताने सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार एम. टी. दहीकर, सुनिल चडगुलवार, अव्वल कारकुन उत्तरा राऊत, एस. एस. चापले व कनिष्ठ लिपीक नितेश चिताडे यांनी सहकार्य केले.
जि.प. क्षेत्रांची नावे स्लाईड प्रोजेक्टरवर दाखविण्यात येत होती. लहान मुलांच्या हाताने सोडत निघाल्यानंतर जिल्हाधिकारी नायक सदर जागांचे आरक्षण ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करीत होते.
या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.चे वित्त नियोजन व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, मनोहर पोरेटी छाया कुंभारे, सुनंदा आतला, सुकमा जांगधुर्वे, अरविंद कात्रटवार, महेंद्र ब्राम्हणवाडे आदीसह अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

दोन्ही नगर पालिकांवर येणार महिलाराज

गडचिरोलीत नामाप्र महिला : देसाईगंजात खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागलेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईतील मंत्रालयात काढण्यात आली. त्यात गडचिरोली नगर परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी, तर देसाईगंज नगर परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले. पूर्वी नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्याने गडचिरोलीचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (सर्वसाधारण), तर देसाईगंजचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) राखीव होते. परंतु यंदा होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आरक्षण बदलण्याचे वारे वाहू लागले होते. आरक्षण सोडत काढल्यानंतर गडचिरोलीचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने आता पक्षांना दमदार महिला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. देसाईगंज येथील नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. एकूणच, दोन्ही नगर परिषदांवर महिला राज येणार आहे.

Web Title: ZP reservation announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.