जळालेली डीपी व वाकलेल्या विद्युत खांबांची अजुनही दुरुस्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 05:00 AM2021-09-15T05:00:00+5:302021-09-15T05:00:37+5:30
नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घटना घडली असता त्यावेळी गावातील नागरिक कुणीच खांबाजवळ नव्हते. नाही तर जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडला असता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्याच्या ग्रामपंचायत कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या उमरेड टोला येथे गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत डीपी जळून, विद्युत खांब वाकल्याने विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या आहेत.. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दुसऱ्या डीपीवरून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी, वेळोवेळी पुरवठा खंडित होत असल्यामुळे विजेचा लपंडाव अद्यापही कायमच आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
कुनघाडा रै. ग्रामपंचायतअंतर्गत वॉर्ड ४ मधील उमरेड टोला हे छोटेसे गाव बांध तलावाच्या काठावर वसले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास दीडशे ते दोनशे आहे. गावात विजेची समस्या लक्षात घेऊन, गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. गावात विद्युत पुरवठा होण्यासाठी विद्युत डीपी लावून मुख्य ठिकाणी विद्युत खांब गाडण्यात आले आहेत. नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घटना घडली असता त्यावेळी गावातील नागरिक कुणीच खांबाजवळ नव्हते. नाही तर जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडला असता. या घटनेस पंधरा दिवस उलटले. डीपी जोडून विद्युत खांब पूर्ववत कण्यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी महावितरण कंपनीच्या तळोधी उपकेंद्राला कळविले आहे. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्युत डीपी व विद्युत खांब पूर्ववत करून नियमित विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी उमरेडवासीयांनी केली आहे.
पाठपुरावा करूनही महावितरणच्या कर्मचारी दुर्गम भागात वीज सुरळीत करण्यासाठी लवकर पाेहाेचत नाही. परिणामी वादळाने वीज पुरवठा खंडित झाल्यास दाेन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लगते. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत हाेत असते.
महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा आराेप
उमरेट टोला हे गाव कुनघाडा रै. ग्रामपंचायतअंतर्गत वाॅर्ड ४ मधील एक भाग आहे, गावात विजेची समस्या लक्षात घेऊन विजेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तेथील डीपी जळून, विद्युत खांब वाकले, तसेच विद्युत तारा खाली कोसळल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. हा प्रकार महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे घडला असून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी केली आहे. सध्या दुसऱ्या डीपीवरून गावात विद्युत पुरवठा सुरू आहे. मात्र, हा विद्युत पुरवठा सायंकाळच्या वेळी वेळोवेळी खंडित होत आहे. तत्काळ डीपी लावून विद्युत पुरवठा सुरू करावा तसेच वाकलेले खांब सरळ करून वीज तारा जोडण्यात याव्यात, अशी मागणी अनिल कोठारे यांनी केली आहे.