'विश्व'विनायक! स्पेनमध्येही उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव, स्थानिकांनी काढली जल्लोषात मिरवणूक
By Balkrishna.parab | Published: September 5, 2017 08:31 PM2017-09-05T20:31:51+5:302017-09-05T20:46:24+5:30
ढोल ताशांचा गजर, मिरवणुकीत मनमोहक नृत्याविष्कार, गुलालाची उधळण आणि दाटलेल्या अंत:करणाने होणारे बाप्पांचे विसर्जन. महाराष्ट्र आणि भारतातील गणेशोत्सवामध्ये हे चित्र दिसणे सामान्य बाब. पण आता हेच चित्र परदेशातही दिसू लागले आहे. इंग्लंड, अमेरिकेत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत तुम्हाला माहीत असेलच. पण आता स्पेनमध्येही गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे.
माद्रिद, दि. 5 - ढोल ताशांचा गजर, मिरवणुकीत मनमोहक नृत्याविष्कार, गुलालाची उधळण आणि दाटलेल्या अंत:करणाने होणारे बाप्पांचे विसर्जन. महाराष्ट्र आणि भारतातील गणेशोत्सवामध्ये हे चित्र दिसणे सामान्य बाब. पण आता हेच चित्र परदेशातही दिसू लागले आहे. इंग्लंड, अमेरिकेत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत तुम्हाला माहीत असेलच. पण आता स्पेनमध्येही गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे. स्पेनमधील गणेशोत्सवाची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशोदेशी स्थायिक होत असलेल्या मराठी आणि भारतीयांसोबत आता गणपती बाप्पासुद्धा ग्लोबल होऊ लागला आहे. स्पेनमध्येही भारतीयांसोबत बाप्पा पोहोचला आहे. तेथे हिंदू भाविकांनी स्थानिक ख्रिस्ती बांधवांसोबत गणेशोत्सव साजरा केला. दगडूशेट हलवाई रूपातील गणपती बाप्पांना अगदी वाजत गाजर पालखीतूनआणले गेले. स्थानिक मंदिरात आणल्यानंतर या बाप्पांची तेथील चर्चमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. तसेच गिटार वाजवून स्थानिक गीते म्हणून बाप्पांना नमन करण्यात आले. यावेळी हिंदूंसोबतच तेथील ख्रिस्ती लोकांचाही उत्साह पाहण्यासारखा होता. बाप्पांच्या विसर्जनावेळी इथल्या गणेशभक्तांप्रमाणेच तेथील गणेशभक्तांना हूरहूर लागली होती. अगदी भावूकपणे त्यांनी बाप्पांच्या निरोपाची तयारी केली. आलिशान बोटीतून बाप्पांच्या मूर्ती खोल समुद्रात नेण्यात आल्या. त्यानंतर शिस्तबद्धपणे बाप्पांच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी गणेशोत्सव साजरा करताना आपले देहभानच हरपून जातो. याचाच प्रत्यय स्कॉटलंडमधील एडिनबरा शहरातही आला. मराठा मित्र मंडळ एडिनबर (एमएमएम-ई) यांनी यंदा ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ (एसजीएफ - २०१७) साजरा केला. यासाठी मुंबईहून खास इकोफ्रेंडली गणेशाची मूर्ती मागवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गणेश स्थापना आणि पूजा फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आली आणि भारतातील सर्व प्रियजनांसह जगभरातील मित्र मंडळींना एडिनबरातील गणपतीचे दर्शन झाले.