रौप्य पदक विजेता शुभम वर्माला १ लाख रुपये जाहीर!
By समीर नाईक | Published: October 29, 2023 05:30 PM2023-10-29T17:30:46+5:302023-10-29T17:30:54+5:30
गोव्याच्या अनुषंगाने शुभम वर्माचे हे पदक खूप महत्वाचे आहे.
पणजी : गोव्याची पदक तालिकेची गाडी सुसाट असताना, दुसरीकडे पदक प्राप्त खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. वेटलिफ्टिंग गोव्याला शनिवारी एकमेव पदक मिळाले, शुभम वर्मा याने रौप्य मिळवून दिले. या पदकामुळे वर्मा लखपती झाला आहे. त्याच्या या कामगिरीसाठी गोवा वेटलिफ्टिंग संघटनेतर्फे वर्माला १ लाख रुपये बक्षीस स्वरूपात जाहीर केले आहे.
गोव्याच्या अनुषंगाने शुभम वर्माचे हे पदक खूप महत्वाचे आहे. तसेच वेटलिफ्टींग मधील हे पहिलेच पदक आहे. गोवा वेटलिफ्टींग संघटनेला या गोष्टीचा खूप अभिमान आहे. वर्माने आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे, त्याचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले, पण त्याने आपले सर्वस्व दिले, यासाठी आम्ही हे बक्षीस जाहीर केले आहे, असे मत गोवा वेटलिफ्टींग संघटनेच्या अध्यक्ष ॲड. प्रियांका नाईक व्यक्त केले.
शुभम वर्माकडून प्रेरणा घेत, इतरांनी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर द्यावी. संघटनेचा पूर्ण पाठिंबा आम्ही वेटलिफ्टर्सना आहे. आतापर्यंत आमच्या वेटलिफ्टर्सनी चांगली कामगिरी केली आहे, आमचे एक कांस्य पदक देखील फक्त एक किलोच्या फरकाने हुकले याची खंत राहणार आहे, असेही ॲड. नाईक यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी गोव्याची पाहिले सुवर्ण पदक मिळवणाऱ्या बाबू गांवकर याला देखील सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई याने १ लाख रुपये, आणि सरपंच राखी नाईक यांच्याकडून ५० हजार रुपये बक्षीस स्वरूपात जाहीर करण्यात आले आहे.