गोव्यातील उद्योगांकडून राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून तब्बल १० कोटी
By किशोर कुबल | Published: March 19, 2024 02:21 PM2024-03-19T14:21:33+5:302024-03-19T14:22:39+5:30
राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून १० कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्या.
पणजी: साळगांवकर, धेंपा व चौगुले उद्योग समुहासह एका बड्या कॅसिनो कंपनीने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मगोप व गोवा फॅारवर्ड तसेच इतर राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून १० कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्या.
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून त्यांना किती देणगी मिळाली हे भाजपने अद्याप जाहीर केले नसले तरी,महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने २०१९ पासून निधी मिळाल्याचे मान्य केले आहे.
दत्तराज साळगावकर यांच्या मालकीची व्ही एम साळगावकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही सर्वात मोठी देणगीदार होती. साळगांकर कंपनीने ४.५ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या तर धेंपो कंपनीने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २.४ कोटी रुपयांच्या देणग्या राजकीय पक्षांना दिल्या. धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी वैयक्तिक पातळीवर १.२५ कोटी रुपयांच्या देणग्या या बॉण्डमधून दिल्या.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी यातील बहुतांश रोखे जानेवारी २०२२ मध्ये खरेदी करण्यात आले होते. राज्यात १४ फेब्रवारी २०२२ रोजी निवडडूक झाली.चौगुले कंपनीने दोन टप्प्यांत २ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले.
गोव्यातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा कंत्राटदारांपैकी एक असलेल्या एमव्हीआर समूहाचे अध्यक्ष मुप्पाना व्यंकट राव यांनी देखील जुलै २०२३
मध्ये दोन टप्प्यांत मिळून ९० लाख रुपयांचे रोखे खरेदी केले. डेल्टा कॉर्प, जे डेल्टिन ब्रँड अंतर्गत कॅसिनो चालवते, त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये ४० लाख रुपयांच्या देणग्या दिल्या.
दरम्यान,२०२२ च्या निवडणुकीपूर्वी मगोपला शिवानंद साळगावकर ग्रुप कंपनीकडून ३५ लाख रुपयांच्या तर याच वर्षात जानेवारीमध्ये व्ही एस धेंपो ॲण्ड कंपनीकडून २० लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या.