'जी-२०' परिषदेसाठी धावणार कदंबच्या १० इलेक्ट्रिक बसेस; प्रशासनाची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:50 AM2023-04-09T08:50:00+5:302023-04-09T08:51:49+5:30
गोव्यात जी-२० शिखर परिषदेसाठी कदंब महामंडळ नव्या १० इलेक्ट्रिक बसेस तैनात करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात जी-२० शिखर परिषदेसाठी कदंब महामंडळ नव्या १० इलेक्ट्रिक बसेस तैनात करणार आहे. राज्यात शाश्वत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याचा गोवा सरकारच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.
पणजीत जी-२० परिषद १७ ते २० एप्रिल दरम्यान होईल. या परिषदेत विदेशातून अनेक प्रतिनिधी सहभागी होतील. या प्रतिनिधींची वाहतूक करण्यासाठी या इलेक्ट्रिक बसेसचा वापर केला जाईल. कदंबकडून ४८ नव्या इलेक्ट्रिक मिनी बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील १० बसेसचा वापर जी-२० परिषदेसाठी केला जाईल.
कदंबच्या नव्या इलेक्ट्रिक मिनी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना क्यूआर कोडव्दारे तिकिटाचे शुल्क जमा करण्याची सुविधा असेल. त्यामुळे या बसेसवर कंडक्टरची गरज भासणार नाही. इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम, जीपीएस ट्रॅकिंग तसेच तंत्रज्ञानाच्या वापराने प्रवाशांना आता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने बसस्थानक ट्रॅक करणे, मार्ग निवडणे, बसेसचे वेळापत्रक आदी शक्य होईल. याशिवाय एलईडी बोर्डच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक बसस्थानकावर आता वरील सर्व माहिती प्रवाशांना मिळेल. यामुळे प्रवाशांनाही चांगली तसेच सुटसुटीत वाहतूक व्यवस्था मिळणे शक्य होईल.
कदंब महामंडळाने जी-२० शिखर परिषदेसाठी इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी विशेष परवानगी दिली आहे. यामुळे जी-२० शिखर परिषद हा एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे. या इलेक्ट्रिक बसेस त्यासाठी तैनात केल्याने वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळेल, असे महामंडळाचे सरव्यवस्थापक डेरीक परेरा नॅटो यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"