५१८ कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर; ३५०० जणांना मिळणार नोकऱ्या
By किशोर कुबल | Published: May 17, 2023 04:37 PM2023-05-17T16:37:52+5:302023-05-17T16:38:13+5:30
मुख्यमंत्री म्हणाले की गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक आता दर महिन्याला घेतली जाणार आहे.
पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या ३३ व्या बैठकीत ५१८ कोटींचे दहा उद्योग मंजूर करण्यात आले आहेत. यातून साडेतीन हजार युवक युवतींना रोजगार मिळेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक आता दर महिन्याला घेतली जाणार आहे. आज झालेल्या बैठकीत मंडळाकडे आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. तीन ते चार उद्योगांना जागा द्यावी लागणार आहे. उर्वरित उद्योगांची स्वतःची जागा आहे. काही फार्मा उद्योगांनी विस्तारासाठी परवानगी मागितली होती ती दिलेली आहे.
वेर्णा, कुंडई येथे फार्मास्युटिकल उद्योगांना बराच वाव आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. एका गोमंतकियाने स्टार्टअप सुरू केला असून या उद्योगाला ही वाव असल्याने त्याला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जमीन उद्योजकांच्या ताब्यात दिल्यानंतर एक ते दीड वर्षात उद्योग सुरू करून त्यांनी नोकऱ्या बहाल करणे अपेक्षित आहे.