१० लाखांची चोरी २४ तासात पकडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 08:40 PM2023-09-28T20:40:08+5:302023-09-28T20:49:58+5:30
उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या चोरीच्या प्रकारा संबंधी सालचेंभाट-रेवोडा येथील विनोद लोकरे यांनी तक्रार दाखल केली होती.
म्हापसा : बार्देश तालुक्यातील रेवोडा येथील एका घरफोडीचा छडा कोलवाळ पोलिसांनी २४ तासात लावून घरातून चोरलेले १० लाख रुपये किमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणात सुधीर सिंग ( २३ वय, रा. रेवोडा, मूळ उत्तर प्रदेश) या संशयिताला अटक केली आहे.
उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या चोरीच्या प्रकारा संबंधी सालचेंभाट-रेवोडा येथील विनोद लोकरे यांनी तक्रार दाखल केली होती. केलेल्या तक्रारीत चोरीचा प्रकार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान घडल्याचे नमुद केले होते. संशयिताने घराचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. आत प्रवेश केल्यावर घरातील कपाटात ठेवण्यात आलेले १९६ ग्राम वजनाचे १० लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. यात मंगळसूत्र, अंगठी, बांगड्या यांचा समावेश होता. तसेच त्या सोबत कपाटातील दिड हजार रुपयेनकदही चोरण्यात आले होते.
केलेल्या तक्रारीनंतर कोलवाळ स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन मडगांवकर, महिला उपनिरीक्षक सोनम वेरेकर तसेच इतरांनी रेवोडा परिसरातील मुख्य रस्त्या सिल करुन तपास कार्य आरंभले. तसेच स्थलांतरीत कामगार रहात असलेल्या रेवोडा परिसरातील तपासणी पोलिसांकडून हाती घेण्यात आली.
या दरम्यान संशयित सुधीर सिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूलही केला. त्याला अटक करून नंतर त्याच्या विरोधात भा. द. सं च्या कलम ४५४ तसेच ३८० खाली गुन्हा दाखल करण्यात आला. चोरलेले सर्व दागीने पोलिसांनी नंतर संशयिताकडून पंचनामा करून ताब्यात घेतले. पुढील तपास कार्य उपनिरीक्षक सोनम वेरेकर यांच्या मार्फत सुरु आहे.