गोव्यात लवकरच 100 इलेक्ट्रिक बसगाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 01:51 PM2018-11-30T13:51:35+5:302018-11-30T14:17:40+5:30
गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणारे कदंब महामंडळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडे समझोता करार करणार असून लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत.
पणजी - गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणारे कदंब महामंडळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडे समझोता करार करणार असून लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत. या शंभर बसगाड्या एनटीपीसी पुरवणार आहे. गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कामही एनटीपीसी करणार आहे. देशात इलेक्ट्रिक बसगाड्याद्वारे वाहतूक करणारे कदंब महामंडळ हे पहिले महामंडळ ठरणार आहे, असा दावाही केला जात आहे.
बसगाड्या तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी सोय करण्याचीही तरतूद आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यासारख्या आघाडीच्या पेट्रोलियम कंपन्यानाही या कामात सामावून घेतले जाणार आहे. या परस्पर समझोता करारासाठीची फाईल सरकारी मंजुरीसाठी गेलेली आहे. जून २०१९पर्यंत ही व्यवस्था करण्याची योजना आहे. करारावर सह्या झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. पंचवीस ते तीस बसगाड्या एका टप्प्यात याप्रमाणे चार वेळा टप्प्यात मिळून वर्षभरात १०० इलेक्ट्रिक बसगाड्या घेतल्या जातील. यासाठीची संपूर्ण गुंतवणूक एनटीपीसी करणार आहे. कदंब महामंडळ एनटीपीसीला किलोमीटरमागे ४७ ते ४९ रुपये भाडे देईल. दिवसाकाठी २०० किलोमीटर बस धावणे गरजेचे आहे. कदंब महामंडळाचा प्रति किलोमीटर तीन ते चार रुपये खर्च वाचेल, असा दावा केला जातो. एका बसवर कदंबचे वर्षाकाठी तीन लाख रुपये वाचतील. या इलेक्ट्रिक बसगाड्या एकदा चार्ज केल्यानंतर १२० किलोमीटरपर्यंत धावतील.