डिसेंबर २०२५ पर्यंत नवे १०० बंधारे: सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 07:37 AM2024-05-28T07:37:03+5:302024-05-28T07:37:41+5:30
"प्रवाह" कडून गोव्याला प्रतिसाद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हादई खोऱ्याची तिन्ही राज्यांनी संयुक्त पाहणी करावी यासाठी गोव्याने तारख्या दिल्या आहेत. "प्रवाह "कडून मात्र आम्हाला अजून त्यावर प्रतिसाद मिळाला नसल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. डिसेंबर २०२५ पर्यंत नवे १०० बंधारे बांधले जातील. यापैकी काही बंधाऱ्यांचे काम एप्रिल व मे महिन्यात सुरू झाले आहे. सध्या राज्यात ३७४ बंधारे आहेत. सरकार रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना एनजीओंनी मार्गदर्शन करावे असेही त्यांनी नमूद केले.
मंत्री शिरोडकर म्हणाले की, म्हादई खोऱ्याची गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तिन्ही राज्यांनी संयुक्त पाहणी करावी यासाठी आम्ही तारखा प्रवाहाला दिल्या आहेत. मात्र सदर प्रस्तावावर अद्याप आम्हाला त्यांच्याकडून काहीच कळवलेले नाही. म्हादईचा विषय हा न्यायप्रविष्ठ असल्याने संयुक्त पाहणी केली जावू शकत नाही, असे कर्नाटक ने म्हटले आहे. त्यामुळे आता यावर प्रवाह काय तो निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. पाणी वाचविण्यासाठी आमचे प्राधान्य असेल, लोकांनीही सहकार्य करावे, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.
धरणांमध्ये पुरेसा जलसाठा, १५ जूनपर्यंत चिंता नको
गोव्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत तरी लोकांनी चिता करण्याची गरज नाही. मात्र जुलै, ऑगस्ट मध्ये जर कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती आली, तर मात्र काहीसा त्रास होऊ शकतो. सरकार रेन वॉटर हार्वेस्टिंग वर देखील भर देत आहे. बंधारे, खाण खंदकांवर आंघोळीसाठी गेल्यानंतर काही जण बुडण्याच्या घटना घडत आहे. जर स्विमिंग येत नसेल तर त्यांनी तेथे जावू नये. न कारण सर्व ठिकाणी आम्ही पोलिस तैनात करु शकत नाही, असे मंत्री शिरोडकर यांनी नमूद केले. गोव्यातील धरणक्षेत्रात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. १५ जून पर्यंत पुरेल एवढा पुरेसा जलसाठा आहे. चिंता नसावी.