५० बाप्पांच्या सेवेत १०० पोलीस व्यस्त; अनुचित घटना घडू नये यासाठी तैनात
By पंकज शेट्ये | Published: September 22, 2023 05:09 PM2023-09-22T17:09:29+5:302023-09-22T17:11:27+5:30
मुरगाव, वास्को आणि वेर्णा पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे.
पंकज शेट्ये लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी ५० सार्वजनिक गणेशमूर्ती पुजलेल्या आहेत. मुरगाव तालुक्यातील विविध भागात साजरा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुरगाव तालुक्यात पुजलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तींच्या मंडपात आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच अनुचित घटना घडू नये यासाठी मुरगाव, वास्को आणि वेर्णा पोलीसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुरगाव तालुक्यातील वास्को, मुरगाव, दाबोळी आणि कुठ्ठाळी अशा चारही मतदारसंघात मिळून ५५ सार्वजनिक गणेशमूर्ती पुजण्यात आल्या होत्या. त्यापैंकी ५ सार्वजनिक गणेशमूर्ती दीड दिवसांच्या असल्याने बुधवारी भाविकांनी त्यांचे मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात विर्सजन केले. मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात मिळून आता ५० सार्वजनिक गणेशमूर्ती असून त्या त्या ठीकाणी भक्तगण मोठी गर्दीकरून देवाचे दर्शन घेताना दिसून येतात. मुरगाव तालुक्यातील ह्या ५० सार्वजनिक गणेश मूर्तीपैंकी १५ पाच दिवसांचे आहेत तर १९ सात दिवसांचे, ८ नव दिवसांचे, १ दहा दिवसांचा (अनंत चतुर्दशी), ६ अकरा दिवसांचे आणि १ एकवीस दिवसांचा सार्वजनिक गणेश आहे.
मुरगाव तालुक्यातील विविध भागात पुजलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेऊन देवाचा आर्शिवाद घेण्यासाठी भक्तांची दररोज मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. तसेच मुरगाव तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी घुमट आरती स्पर्धा, संगीताचे आणि इतर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने त्यानिमित्ताने लोकांची गर्दी होत आहे. मुरगाव तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडपात देवाचे दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असून बायणा, वास्को येथील विनाकय कला संघ, वास्कोतील शांतादुर्गा कला आणि क्रिडा संघ, दाबोळीचा राजा, मुरगावचा राजा, वास्को पोलीस स्थानक, मुरगाव पोलीस स्थानक, वेर्णा पोलीस स्थानक आणि इतर अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी अप्रतीम - सुंदर सजावट आणि देखावे केल्याने ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुरगाव तालुक्यात पुजलेल्या ५५ गणेश मूर्तीच्या मंडपात आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था रहावी यासाठी वास्को, मुरगाव आणि वेर्णा पोलीसांनी चौख व्यवस्था केलेली आहे. मुरगाव तालुक्यात पुजलेल्या प्रत्येक सार्वजनिक गणेश मूर्तीच्या मंडपात आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी एक पोलीस हवालदार आणि एक पोलीस शिपाई तेथे ड्युटीवर नियुक्त केलेला आहे. नियुक्त केलेला पोलीस हवालदार आणि शिपाई सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत पाळी पाळीने तेथे ‘ड्युटी’ बजावणार असल्याची माहीती प्राप्त झाली. तसेच मुरगाव तालुक्यातील वेर्णा, वास्को आणि मुरगाव पोलीसांचे वाहन रात्री आणि इतर वेळी सार्वजनिक गणेश मूर्ती पुजलेल्या मंडपात आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्वकाही व्यवस्थीत आहे याची खात्री करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा गस्त मारत असल्याचे दिसून येत आहे. ५५ पैंकी ५ दिड दिवसांच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याने मुरगाव तालुक्यातील ५० सार्वजनिक गणेश मूर्तीच्या मंडपात आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्वकाही ठीक आहे त्याची खात्री करून घेण्यासाठी १०० पोलीस सद्या ‘ड्यूटी’ बजावित आहेत.
मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा आणि मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेश मूर्तीच्या मंडपात आणि परिसरात आम्ही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे. प्रत्येक सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठीकाणी ‘ड्यूटीवर’ एक पोलीस हवालदार आणि एक पोलीस शिपाई नियुक्त केलेला असून गणेश मूर्तीचे विर्सजन होईपर्यंत ते पाळी पाळीने सेवा बजावणार आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुरगाव तालुक्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी गोव्याच्या इतर भागातून येथे ‘ड्युटी’ साठी १५ अतिरिक्त पोलीस जवान पाठवले आहेत. गणेश चतुर्थीवेळी सार्वजनिक गणेश मंडपात आणि इतर ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि इतर पोलीस गस्त मारून आणि इतर माध्यमाने नजर ठेवत आहे. - सलीम शेख, पोलीस उपअधीक्षक.