गोव्यात जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद; रस्ते, बाजारपेठ, किनाऱ्यांसह धार्मिक स्थळांवरही शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:43 PM2020-03-22T12:43:56+5:302020-03-22T13:00:14+5:30
अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेने आज हॉटेल्स बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हॉटेलेही बंद राहिली. पेट्रोल पंप बंद आहेत.
पणजी : गोव्यात जनता कर्फ्यूला लोकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. सर्व रस्ते निर्मनुष्य बनले असून बाजारपेठा ओस पडल्या आहेत. बसेस बंद आहेत, रस्त्यावर केवळ पोलीसच दिसत आहेत. किनारे, धार्मिक स्थळेही निर्मनुष्य बनली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून गोव्यातील जनतेने सजगता दाखवत उस्फूर्तपणे घरातच राहणे पसंत केले. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. राजधानी शहरातील रस्ते सुने सुने झाले होते. सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. मासळी मार्केट बंद आहे. भाजी बाजारही बंदच राहिला.
अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेने आज हॉटेल्स बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हॉटेलेही बंद राहिली. पेट्रोल पंप बंद आहेत. रस्त्यावर एकही वाहन दिसत नाही. कदंब महामंडळाने मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच बेळगाव, मुंबईकडे जाणाऱ्या आंतरराज्य बसगाड्या कालपासूनच बंद केल्या आहेत. शेजारी राज्यांमधून बस गाड्याही गोव्यात येत नाहीत. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लोकांनी घरीच टीव्हीवर बातम्या पाहणे पसंत केले.
आजच्या कर्फ्यूला राज्यातील सर्व राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला होता. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले होते. गोवा फॉरवर्ड पक्षाने तर आपले पक्ष कार्यालय पुढील दोन आठवड्यांसाठी बंद केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकी साठी उघडलेली प्रचार कार्यालयेही विविध उमेदवारांनी गर्दी टाळण्यासाठी बंद केलेली आहेत.