१ हजार कोटींची थकीत वीज बिले अगोदर वसूल करा
By पूजा प्रभूगावकर | Published: June 25, 2024 04:41 PM2024-06-25T16:41:20+5:302024-06-25T16:42:12+5:30
पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभूदेसाई म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, भाज्यांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांवर यापूर्वीच महागाईचा बोजा पडत आहे.
पणजी: वीज बिलांत वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सरकारने अगोदर १ हजार कोटींची थकीत वीज बिले वसूल करावी व वीज बिल दरवाढ त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे वीज खात्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन गोवा फॉरवर्ड पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य वीज अभियंत्यांना सादर केले. खात्याने वीज बिल दरवाढ मागे न घेतल्यास पक्ष गप्प बसणार नसून वेळ पडल्यास खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा आणू. सामान्यांना वीज दरवाढीमुळे होणारा त्रास सहन करणार नसल्याचा इशाराही पक्षाच्या नेत्यांनी दिला.
पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभूदेसाई म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, भाज्यांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांवर यापूर्वीच महागाईचा बोजा पडत आहे. त्यातच आता सरकारने वीज दरवाढ केली आहे. वीज खात्याला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने ३.५ टक्के वीज दरवाढ केल्याचे म्हटले जात आहे. खरे तर सरकारने वीज बिलांत वाढ करण्याएवजी १ हजार काेटींची थकीत वीज बिले वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली.