तब्बल १०२ वर्षीय मारियानी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 07:55 PM2019-05-20T19:55:25+5:302019-05-20T19:55:33+5:30
म्हणतात ना...‘वय केवळ आकड्यांचा खेळ आहे’. इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य गोष्टही शक्य करून दाखवता येते.
- सचिन कोरडे
पणजी : म्हणतात ना...‘वय केवळ आकड्यांचा खेळ आहे’. इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य गोष्टही शक्य करून दाखवता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारिया आंतानेतो आफोन्सा. मारिया यांचे वय तब्बल १०२ वर्षे आहे. वयाचे शतक गाठलेल्या या महिलेने पणजी पोटनिवडणुकीत रविवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांच्या चेह-यावर कमालीचे समाधान दिसून आले. प्रचंड जोशात त्या बोटावरील शाही आणि मतदान कार्ड दाखवत होत्या. राज्यातील सर्वात वयोवृद्ध महिला मतदार म्हणून मारिया यांची नोंद झाली.
वेळ जवळपास सकाळी ११.४५ वाजताची असेल. आल्तिनो येथील १५ नंबरच्या मतदान केंद्रावर वृद्धाश्रमातील महिलांना विशेष वाहनातून आणण्यात येत होते. त्याचवेळी एका कारच्या काचातून वृद्ध महिला पोलिंग बूथकडे पाहत होती. तिच्या सोबत असलेले परिवारातील सदस्य व्हिलचेअरच्या प्रतीक्षेत होते. दोन अधिका-यांच्या मदतीने मारिया यांना व्हिलचेअरसह गाडीतून खाली उतरवण्यात आले. त्यांच्या परिवारातील मंडळींनी अधिका-यांना मारिया यांनी १०२ वर्षे पूर्ण केल्याची माहिती दिली तेव्हा अधिका-यांना आश्चर्य वाटले.
कारण त्यांच्यातील उत्साह आणि उत्सुकता प्रचंड दिसत होती. आपण मतदान केंद्रावर जाणार आणि मतदान करणार, असा हट्ट मारिया यांनी आपल्याकडे केला होता. त्यामुळे निवडणूक अधिका-यांच्या सहकार्याने मी त्यांना घेऊन आलो असून, ब-याच वर्षांनंतर त्यांनी मतदान केले, असेही मारिया यांच्या परिवारातील सदस्याने सांगितले. मतदान करून आल्यानंतर मारिया यांच्या चेह-यावर कमालीचे समाधान दिसून आले. गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र त्या मतदान करू शकल्या नाहीत.
दरम्यान, मारिया सध्या पॅलिकन अपार्टमेंट, आग्नेलो रोड, पणजी येथे आपल्या मुलासोबत राहतात. त्यांचा जन्म १८ मार्च १९१७ रोजी झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या मार्च महिन्यातच त्यांनी आपल्या वयाची १०२ वर्षे पूर्ण केली आहेत. वृद्ध लोकांसाठी सरकारने ने-आण आणि व्हिलचेअरची व्यवस्था चांगल्यारितीने केली असून, आपण सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे मारिया यांच्या परिवाराने सांगितले.
११५ पैकी १0१ दिव्यांगांनी केले मतदान!
या पोटनिवडणुकीत १0१ दिव्यांग मतदारांनी मतदान केले. मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या ११५ असून ८८ टक्के मतदान झालेले आहे. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प तसेच व्हील चेअरची व्यवस्था करण्यात होती. काही केंद्रांवर मात्र व्हील चेअरचा वापर झालाच नाही. मतदानासाठी येणाºया दिव्यांगांची कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी व्हील चेअर आयोगाने मागविल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर एक व्हील चेअर देण्यात आली होती. दिव्यांग मतदारांची यादी तयार करण्याची जबाबदारी बीएलओंकडेच सोपविण्यात आली होती.