दोन महिन्यात वास्कोत १०५ झाडं कोसळली; एकाचा दुर्देवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:43 PM2019-07-29T15:43:11+5:302019-07-29T15:44:18+5:30

अनेकांचे आर्थिक नुकसान, वाहतूकीवरही परिणाम

105 trees fell in Vasco in two months | दोन महिन्यात वास्कोत १०५ झाडं कोसळली; एकाचा दुर्देवी अंत

दोन महिन्यात वास्कोत १०५ झाडं कोसळली; एकाचा दुर्देवी अंत

Next

- पंकज शेट्ये

वास्को: गोवा राज्यातील वास्को शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे १०५ झाडे कोसळलेली आहेत. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. शिवाय वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. वास्कोतील स्वतंत्र पथ मार्गावर १०० वर्ष आयुमान असलेले अशोकाचे झाड कोसळल्याने गोव्यातील धारबांदोडा येथील सतीश गोपाळ गावकर (वर ४२) नावाच्या तरुणाचा दुर्देवी अंत झाला होता. त्यानंतर ह्या मार्गावर असलेली अन्य अनेक जुनी झाडे मुरगाव नगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कापली होती.

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडतच असतात. मात्र, या वर्षी जून व जुलै या दोन महिन्यात वास्को व परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. जून महिन्यात पावसाळ्याची सुरवात झाल्यानंतर वास्कोतील विविध ठिकाणावरील ४६ झाडे कोसळलेली असून जुलै महिन्याच्या सुरवातीपासून अजून पर्यंत ५९ झाडे कोसळली असल्याची माहिती वास्को अग्निशामक दलाचे अधिकारी फ्रांन्सिस्को मेंडीस यांनी दिली. झाडे कोसळण्याच्या ह्या घटनेमुळे नागरिकांच्या घरांचे, वाहनांचे नुकसान सोसावे लागले असून एका घटनेत एका दुचाकीस्वाराचा दुर्देवी अंत होण्याची घटना घडली आहे.

२२ जूनला पहाटे धारबांदोडा येथून कामाच्या निमित्ताने सडा, मुरगाव येथे येत असलेला सतीश गावकर आपल्या दुचाकीने स्वतंत्रपथ मार्गावर पोहोचले असता येथे झाड कोसळून घडलेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. सदर मार्गावर कोसळलेले अशोकाचे झाड सुमारे १०० वर्षीय जुने असून ते येथे असलेल्या वीज खांब व वाहिन्यांना घेऊन रस्त्यावर कोसळले. त्यावेळी दुचाकीने येथून जात असलेल्या सतीश याच्या गळ्यात एक वीज वाहिनी अडकून त्यांच्या मानेचे हाड तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वास्को शहरातील स्वतंत्रपथ मार्गावर अशा प्रकारची अनेक जुनी व धोकादायक बनलेली अशोकाची झाडे असून सदर घटनेनंतर ती कोसळणार असल्याची भीती नागरिकांत निर्माण झाली होती.

झाड कोसळून सतीश यांच्या मृत्यूला ४८ तास होत असतानाच २४ जूनला याच मार्गावर अन्य एक जुने अशोका वृक्ष कोसळण्याची दुसरी घटना घडली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असून येथून कोणीच जात नसल्याने सुदैवाने ह्या घटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मात्र, या मार्गावर काही वेळासाठी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. अशा प्रकारे या मार्गावरील जुनी धोकादायक बनलेली अशोका झाडे कोसळत असल्याचे पुन्हा जाणवताच नंतर मुरगाव नगरपालिकेने त्वरित पावले उचलून सदर मार्गावर असलेली जुने वृक्षे कापण्याचे काम हातात घेऊन ते पूर्ण केले.

वास्को शहरात मागच्या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे १०५ झाडे कोसळलेली असून ११ जुलै रोजी एकाच दिवसात विविध ठिकाणी सर्वात जास्त अशी २२ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. सदर २२ झाडापैंकी ७ झाडे विविध भागातील नागरिकांच्या घरावर तसेच ३ वाहनांवर कोसळल्याने त्यांच्या मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागल्याची माहिती वास्को अग्निशामक दलातील सूत्रांनी दिली. याबरोबरच ह्या घटनामुळे विविध ठिकाणांवर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामनासुद्धा करावा लागला.

२८ जून रोजी वास्को तसेच जवळपासच्या भागात ९ झाडे कोसळून यापैकी ३ घरांवर व एक चारचाकीवर कोसळल्याने यांच्या मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले असून अन्य झाडे रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. २९ जून रोजी मुसळधार पावसाच्या काळात जेटी - सडा भागातील एका नागरिकाच्या घरावर, बेलाबाय भागातील रस्त्यावर, चखली येथील महामार्ग रस्त्यावर तसेच अन्य एका ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडल्याने घरमालकाला आर्थिक नुकसान सोसावे लागण्याबरोबरच विविध भागात रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

१२ जून रोजी मेस्तावाडा, वास्को येथील रस्त्यावर, साकवाळ जासिंन्तो बेट च्या जवळ असलेल्या एका कुटुंबाच्या घरावर व अन्य दोन ठीकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली होती. ११ जून रोजी संध्याकाळी कुठ्ठाळी - रासय ह्या मार्गावर भलेमोठे झाड कोसळल्याने सदर मार्गावर सुमारे दोन तास वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. 

Web Title: 105 trees fell in Vasco in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा