१0८च्या महिला कर्मचाऱ्यांची परवड
By Admin | Published: February 22, 2015 01:24 AM2015-02-22T01:24:28+5:302015-02-22T01:24:43+5:30
पणजी : सात वर्षांपासून १0८ रुग्णवाहिकेमार्फत राज्यभर तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांची होणारी
पणजी : सात वर्षांपासून १0८ रुग्णवाहिकेमार्फत राज्यभर तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय आंदोलनामुळे प्रथमच समोर येत आहे. असुरक्षित आणि अस्वच्छ अशा परिस्थितीत सात वर्षे रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचारी केवळ नोकरी
टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही तक्रार न करता सेवा बजावत राहिल्या. ‘लोकमत’शी बोलताना काही महिला कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना होणारी परिस्थिती मांडली.
२00८ साली राज्यात १0८ रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा गोव्याबाहेरील जीव्हीएमके इएमआरआय व्यवस्थापनांतर्गत चालवण्यात येत आहे. या सेवेत काम करण्यासाठी गोव्यातील तरुणांची भरती झाली. सुरुवातीला ३0 ते ३५ महिला कर्मचारी व्यवस्थापनांतर्गत सेवा बजावत होत्या. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे गोवा राज्य आरोग्य खाते आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांची काळजी घेतली जाणाऱ्या व्यवस्थापनाने मात्र महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. यामुळे बऱ्याच महिला कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागते.
विविध शहरांतील १0८ रुग्णवाहिका स्थानिक पोलीस स्थानक व पोलीस आउट पोस्टवर उभे करून ठेवण्यात येतात. या रुग्णवाहिकेत एक वाहक आणि एक महिला मेडिकल सहकारी असायची. या कर्मचाऱ्यांना सेवेच्या वेळेत सातत्याने वाहनात बसून किंवा वाहनाबाहेर उभे राहावे लागे. रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्यास महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी व्यवस्थापन घेत नाही. पोलीस शौचालयांचाच वापर रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना करावा लागत असे. पोलीस आउट पोस्टवर महिला पोलीस कर्मचारी असत नाहीत. मात्र, आउट पोस्टवर ड्युटी करणाऱ्या रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना मात्र नाईलाजाने आउट पोस्टवरील शौचालयच वापरावे लागत असे. रात्रीच्या वेळी ड्युटी बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रेस्ट रूमची मागणी करण्यात आली होती. मात्र, व्यवस्थापन महिलांसाठी सुरक्षित रेस्ट रुम पुरवण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले असल्याचा आरोप १0८ रुग्णवाहिकेच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)