गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीबाबत बुधवारपर्यंत निर्णय; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:24 PM2021-05-23T17:24:37+5:302021-05-23T17:33:10+5:30
10th class exams cancelled in Goa : बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय झालेला नाही. जेईई, नीट परीक्षांबाबत केंद्र सरकार येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे.
पणजी - कोविडमुळे राज्यात लांबणीवर टाकलेल्या इयत्ता दहावीच्यापरीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षांबाबत येत्या बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुणांवर आधारित पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. अंतर्गत गुण कमी असल्यास आणि एखाद, दुसरा विषय राहत असल्यास एटीकेटीची मुभा असेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय झालेला नाही. जेईई, नीट परीक्षांबाबत केंद्र सरकार येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे. त्यानंतर बुधवारपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. इयत्ता अकरावीत प्रवेशाबाबत विज्ञान आणि पदविका क्षेत्रात चढाओढ होणार आहे. त्यामुळे एका दिवसाची तीन तासांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेऊनच या शाखांसाठी प्रवेश दिला जाईल.
मुख्यमंत्री सावंत यांनी सायंकाळी या घोषणा केल्या. तत्पूर्वी सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री सावंत यांनी भाग घेतला. अन्य राज्यांचे शिक्षणमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. सावंत यांनी गोव्यातील कोविड स्थितीबाबत राजनाथ सिंह यांना कल्पना दिली.
गोव्यात बारावीची परीक्षा २४ एप्रिलपासून सुरू होणार होती व ती १५ मे पर्यंत चालणार होती. तर दहावीची परीक्षा १३ मे ते ४ जूनपर्यंत चालणार होती. मात्र राज्यात कोविडच्या वाढत्या फैलावामुळे २१ एप्रिल रोजी राज्यात कर्फ्यू लागू करताना या परीक्षा पुढे ढकलल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले होते. परीक्षांची नवी तारीख १५ दिवस आधी घोषित केली जाईल, असेही त्यांनी त्यावेळी म्हटले होते. परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी तसेच पालक संभ्रमात होते. दरम्यान, सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द केलेल्या आहेत बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.