दहावा गोवा लघुपट महोत्सव ४ नोव्हेंबरपासून; मराठी चित्रपट परिवारातर्फे महोत्सवाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:52 PM2023-11-02T13:52:39+5:302023-11-02T13:54:22+5:30
महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, या प्रदर्शन करण्यात आलेल्या लघुपटापैकी ४० लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पणजी : नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे शनिवार ४ व रविवार ५ नोव्हेंबर रोजी कला व संस्कृती खात्यामध्ये दहावा गोवा लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शनिवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेमध्ये तसेच ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत विविध देशातील १०० हून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ५ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
या महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, या प्रदर्शन करण्यात आलेल्या लघुपटापैकी ४० लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे. महोत्सवासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही महोत्सवासंबंधित अधिक माहितीसाठी योगेश बारस्कर ९८९०८५०९०३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.