मतदारराजाचा दिवस; सर्वच उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ८० हजार मतदार ठरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 09:39 AM2024-05-07T09:39:50+5:302024-05-07T09:40:51+5:30
राज्यातील १,७२५ मतदान केंद्रांसह यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क,पणजी: राज्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी आज, मंगळवारी ७ रोजी मतदान होत असून, तब्बल ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार सहा प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.
दक्षिण गोव्यातून भाजपच्या पल्लवी धंपे व काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फनर्नाडिस यांच्यात मुख्य लढत आहे. तर आरजीचे रुबर्ट परेरा यांच्यासह अपक्ष मिळून या मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात आहेत. तर उत्तर गोव्यात सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेले केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक भाजपतर्फे व काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात आरजीचे प्रमुख मनोज परब यांनीही आव्हान उभे केले आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ मतदानाची वेळ आहे. निवडणूक कर्मचारी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन व इतर साहित्य घेऊन सर्व १ हजार ७२५ मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत.
उकाड्यामुळे प्रथमच आयोगाने मतदान केंद्रांवर लिंबू पाणी व शीतपेयाची सोय केली आहे. तसेच कुलर्सही बसविले आहेत. आठ मॉडेल मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची मतदानानंतर आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. शहरी भागात जिथे वृद्ध मतदारांची संख्या जास्त आहे, अशा भागातच ही सोय आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या १२ तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय स्थानिक पोलिस मिळून सुमारे ४८०० पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तावर असणार आहे.
८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठणार?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ७६.८६ टक्के मतदान झाले होते. तर एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७४.७२ टक्के मतदानाची नोंद झाली. याची दखल घेत आता या निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे.
२,४८९ टपाल मतदान
निवडणूक कामानिमित्त असलेले कर्मचारी तसेच बंदोबस्तावर नेमलेले पोलिस, गृहरक्षक, आदी मिळून २,४८९ जणांनी टपाल मतदान केले. ३० एप्रिल ते ५ मे या काळात टपाल मतदान घेण्यात आले. तसेच ८५ वर्षे वयावरील ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी घरबसल्या मतदान घेण्यात आले.
आज भरपगारी सुटी
निवडणुकीनिमित्त आज, मंगळवारी ७ रोजी सर्व सरकारी, खासगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी जाहीर करणारी अधिसूचना काढण्यात आली आहे. 'मतदानाचा दिवस' म्हणून ही भरपगारी सुटी घोषित करण्यात आली असून, सरकारी कार्यालयांसह औद्योगिक कामगार, सरकारी खात्यांमधील रोजंदारी कामगार, सर्व प्रकारची खासगी अस्थापने, उद्योग, व्यापार क्षेत्रातील कर्मचत्यांना ही भरपगारी सुटी लागू आहे.
विदेशी पथके
निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी भूतान, मंगोलिया व इस्रायलमधून अधिकारी व पत्रकारांची पथके गोव्यात आली आहेत. काल सकाळी त्यांनी ताळगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिटामवर इव्हीएम यंत्रे वितरणाची व्यवस्था पाहिली. तसेच आज मतदानाच्या दिवशी ही पथके मतदान केंद्रांवर फिरून कशा प्रकारे मतदान चालते, याचा अभ्यास करणार आहेत.