गोव्यात कॅसिनो चालविणाऱ्या डेल्टा कॉर्पला ११,१३९ कोटी GST थकबाकीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 06:23 AM2023-09-25T06:23:46+5:302023-09-25T06:24:39+5:30

कंपनीची एकूण थकबाकी १६,८२२ कोटी रुपये इतकी आहे.

11,139 crore GST arrears notice to Delta Corp, which operates casinos in Goa | गोव्यात कॅसिनो चालविणाऱ्या डेल्टा कॉर्पला ११,१३९ कोटी GST थकबाकीची नोटीस

गोव्यात कॅसिनो चालविणाऱ्या डेल्टा कॉर्पला ११,१३९ कोटी GST थकबाकीची नोटीस

googlenewsNext

पणजी: गोव्यात कोट्यवधींची उलाढाल करणारा कॅसिनो असलेल्या डेल्टा कॉर्पोरेशनला बंगळूर जीएसटी आयुक्तांनी ११,१३९.६१ कोटी रुपये जीएसटी थकबाकीची नोटीस बजावली आहे. कंपनीची एकूण थकबाकी १६,८२२ कोटी रुपये इतकी आहे.

कंपनीला ११,१३९.६१ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावण्यात आली असून दुसरी नोटीस, ५,६८२ कोटींची या कंपनीच्या ३ उपकंपन्यांना बजावण्यात आली आहे. कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा प्लेजर क्रूझ या त्या कंपन्या आहेत. या पैकी डेल्टा प्लेजर क्रूझ ही गोव्यात पर्वरी येथे आहे. या कंपनीचा मांडवीत ऑफशोर कॅसिनोही आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतची जीएसटी थकबाकीची ही रक्कम आहे.

...कारणे दाखवा
कंपनीकडून ही रक्कम फेडली नाही तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कंपनीने याची कबुली आपल्या वार्षिक अहवालातही दिली आहे. मात्र डेल्टा कॉर्पने आपल्या बचावार्थ जीएसटी संचालनालयाने लादलेली जीएसटी आणि नोटीसही मनमानी आहे असे म्हटले आहे. कर आणि बजावण्यात आलेली नोटीस दोन्हीही बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नोटिसीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत असे कंपनीने म्हटले आहे.

‘लोकमत’ने चालविली होती वृत्तमालिका
गोव्यात कायदे नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या विविध कॅसिनोंच्या कारनाम्यांचा पंचनामा करणारी वृत्तमालिका दैनिक लोकमतने  चालविली होती. कॅसिनोंकडून होणारा करबुडवेपणा, वाणिज्य खात्याच्या आदेशांना कॅसिनोंकडून दाखविल्या जाणाऱ्या वाकुल्या, मांडवीचे पाणी प्रदूषित करण्याचे प्रकार आणि इतर अनेक गैरकृत्यांचा पाढा वाचणारी वृत्तमालिका लोकमतने चालविली होती. या वृत्ताबद्दल  लोकांनीही लोकमतचे खूप कौतुक केले होते.

शेअर्स गडगडले
डेल्टा कॉर्पला बजावण्यात आलेल्या नोटिसीचा अपेक्षित परिणामही शेअर बाजारावर झाला. कंपनीचे शेअर्स विकण्याची एकच झुंबड उडाली आणि मुंबई शेअर एक्सचेंजच्या नोंदीनुसार डेल्टाकॉर्पचे शेअर्स ०.०२९ टक्क्यांनी घसरून १७५.२५ रुपयांवर बंद झाले. सोमवारी शेअर मार्केट खुला झाल्यानंतरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Web Title: 11,139 crore GST arrears notice to Delta Corp, which operates casinos in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.