१२ विद्यार्थिनी अत्यवस्थ; चौकशीस सुरुवात, डिचोली येथील शांतादुर्गा विद्यालयातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:04 AM2023-08-18T11:04:28+5:302023-08-18T11:06:17+5:30
'ते' विद्यार्थी निलंबित होणार; 'पेपर स्प्रे'चा वापर केल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: डिचोली येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना काल श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ माजली. अकरावीच्या अ तुकडीत वर्ग सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने शिक्षकांचीही भंबेरी उडाली.
तातडीने पळापळ करत विद्यार्थ्यांना डिचोली व म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा दहा जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पेपर स्प्रेचा वापर केल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच विद्यार्थ्यांनी हा प्रताप केल्याचे समोर आले असून त्यांची ओळख पटली आहे. या विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत आहेत.
सविस्तर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे काल शांतादुर्गा विद्यालयात वर्ग सुरू असतानाच अकरावी अ तुकडीत एकच गोंधळ उडला. वर्गातील विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू होऊन चक्कर येऊ लागल्याने व्यवस्थापनाची पाचावर धारण बसली. तातडीने या विद्यार्थ्यांना डिचोली सरकारी इस्पितळात दखल करण्यात आले. त्यातील दहा विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी म्हापसा येथील आझिलो इस्पितळात पाठवले.
या घटनेची माहिती पालकांपर्यंत पोहोचताच त्यांनी इस्पितळांमध्ये धाव घेतली. डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक आपल्या पथकासह विद्यालयात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी वर्गात पेपर स्प्रेचा वापर केला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकराला विद्यालयातील चार ते पाच विद्यार्थी जबाबदार असल्याची माहिती समोर आली असून त्यांची ओळख पटली आहे. सध्या शाळा व्यवस्थापन या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
दहा जणांना डिस्चार्ज
वर्गात जो उग्रवास आला व त्यातून मुलांना श्वसनाचा त्रास झाला तो पेपर स्प्रे होता की अन्य काही होते या बाबत तपास करण्यात येत आहे. पोलिस पथकाने उपचार घेणाऱ्या मुलांशीही चर्चा केली आहे. रात्री १२ पैकी १० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
या संदर्भात विद्यालय व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माध्यमातून या प्रकरणाची चौकशी केली असून अधिक तपास करण्यात येत आहे. व्यवस्थापन समितीने या संदर्भात कसून चौकशी सुरु आहे.
या प्रकरणात विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वीक हाताळले जाईल. पोलिस तसेच शिक्षण खात्यामार्फत कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विद्याथ्र्यांनीय स्प्रे मारल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे व्यवस्थापनास आदेश दिले आहेत. -डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
विद्यालयात विद्याथ्यांकडूनच झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. सर्वजण अल्पवयीन असल्यामुळे व्यवस्थापनाने या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करावी. तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी वर्गात व विद्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. राहुल नाईक, पोलिस निरीक्षक.
डिचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील १० विद्यार्थ्यांना डिस्चार्ज दिला आहे. एका विद्यार्थ्याला ताप होता. त्यामुळे निरीक्षणासाठी त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. सर्वांची तब्येत चांगली आहे. - डॉ. वंदना घुमे, वैद्यकीय अधिक्षक.
कारणे दाखवा नोटीस
शिक्षण खात्याने काल सायंकाळी उशिरा शांतादुर्गा विद्यालयावर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत सविस्तर अहवाल व स्पष्टीकरण मागितले आहे. शिक्षण संचालक शैलेश झगडे नोटिसीत
म्हणतात की, अशा घटना विद्यार्थ्यांवरच परिणाम करतात असे नव्हे तर शिक्षण व्यवस्थेलाही बाधक
आहेत. शाळा संस्थेच्या चेअरमनना ही नोटीस बजावण्यात आली.