गोव्यातील १२ हजार विद्यार्थी अद्याप रेनकोट, गणवेशापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 01:28 PM2019-07-10T13:28:12+5:302019-07-10T13:30:51+5:30
पालकांकडून नाराजी व्यक्त
पणजी : गोव्यात प्राथमिक शाळांमधील तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांना जून उलटला तरी अद्याप रेनकोट आणि गणवेश मिळालेले नाहीत. यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मान्सून सुरु होऊन पंधरा दिवस झाले. गरीब, गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागते. प्राप्त माहितीनुसार खादी ग्रामोद्योग मंडळाकडून रेनकोट व गणवेश घेतले जातात. लोकसभा तसेच विधानसभेच्या चार मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीनिमित्त २६ मेपर्यंत आचारसंहिता लागू होती त्यामुळे त्याआधीच प्रक्रिया सुरु केलेली होती. असे असतानाही विद्यार्थ्यांना या वस्तू मिळू शकलेल्या नाहीत.
सरकारी व अनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रेनकोट व गणवेश दिले जातात. दर दोन वर्षांनी इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. त्यासाठी खात्याने भरीव आर्थिक तरतूदही केलेली असते. परंतु यंदा या योजनेत किंचित बदल करण्याच्या हालचाली चालल्याची माहिती मिळते. वह्या आणि पाठ्यपुस्तके मात्र मिळालेली आहेत.
विद्यार्थ्यांना रेनकोट, गणवेश न मिळाल्याचा विषय आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी कंबर कसली आहे. शिक्षण खात्याचे संचालक नागराज होन्नेकेरी यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनी मोबाइल फोन कॉलला उत्तर दिले नाही.