विदेशात नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांना गंडवले; अहमदाबादेतून संशयितास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:39 AM2023-06-09T11:39:34+5:302023-06-09T11:39:53+5:30

शंभर जणांची फसवणूक; बोगस ऑफरपत्रे दिली, मुंबईत | नेऊन प्रशिक्षण दिल्याचेही समोर

13 lakh cheated by luring jobs abroad Suspect arrested from ahmedabad | विदेशात नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांना गंडवले; अहमदाबादेतून संशयितास अटक

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांना गंडवले; अहमदाबादेतून संशयितास अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : विदेशात नोकरीचे आमिष दाखवून गोव्यातील अनेकांकडून पैसे घेऊन १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत बालचंद गायकवाड व सावियो लिलास लेनटिनो डिसिल्वा, अशी त्यांची नावे आहेत. यातील अनिकेत याला अटक करण्यात आली आहे.

जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अनिकेत व सावियो यांनी स्वत:ची ओळख विदेशात नोकरी देणारे एजंट अशी करून दिली. इंटरनेटवरून त्यांनी जाहिरातही केली. त्यामुळे अनेकांनी त्यांच्याशी संपर्क केला. नोकरीची ऑफरपत्रे अगोदर दिली. ही ऑफरपत्रे अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशात मोठ्या शिपिंग आणि कार्गो कंपनीत नोकरीची असल्याचे त्यांना सांगण्यात आले. वास्तविक ती बोगस ऑफरपत्रे होती. परंतु ती ओळखणे अर्जदारांना जमले नाही. त्यामुळे त्यांनी शुल्क, प्रशिक्षण व इतर कामांसाठी मागितलेले पैसे देऊन टाकले. परंतु त्यांना नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे त्यापैकी काहींनी जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. पहिली तक्रार चिंबल येथील मयुर कुंकळ्येकर यांनी नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला आणि दोघांपैकी मुख्य सूत्रधार असलेला अनिकेत याला अहमदाबाद येथे जाऊन अटक करण्यात आली.

बोगस ऑफरपत्रे

संशयितांच्या फसव्या आमिषांना बळी पडून १०० हून अधिक लोकांनी त्यांच्याकडे अर्ज केले होते. सर्वांना त्यांनी बोगस ऑफरपत्रे दिली होती आणि प्रत्येकाकडून ५ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले होते. त्यामुळे एकूण फसवणुकीचा आकडा हा फार मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जंग जंग पछाडले

मुख्य संशयित अनिकेत गायकवाड याच्या शोधासाठी जुने गोवा पोलिसांना खूप धडपड करावी लागली. उपनिरीक्षक लॉरिन सिवचेरा यांच्या नेतृत्वाखालील टीमने पनवेल, बेलापूर, दादर, कुर्ला, मुलुंड या ठिकाणीही त्याचा शोध घेतला, शेवटी चिंचोळी अहमदनगर येथे त्याला मुंबई पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले.

असा केला बनाव

फसवणूक करणारे हे सराईत गुन्हेगार असल्याचेही त्यांच्या मोडस ऑपरेंडीवरून स्पष्ट होत आहे. कारण ते अस्सल नोकरभरती एजंट वाटावेत आणि लोकांचा विश्वास बसावा यासाठी अर्जदारांना सर्व प्रकारची शैक्षणिक व कामाच्या अनुभवाची प्रमाणपत्रे आणि पासपोर्टच्या प्रतीही सादर अर्जासोबत जोडण्यास सांगण्यात आले होते. इतकेच नव्हे तर नोकरीसाठी त्यांची निवड झाली याची खात्री देण्यासाठी मुंबईत नेऊन त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. एखादी व्यावसायिक नोकर भरती एजन्सी वाटावी, असा बनाव त्यांनी केला होता.

चोर सापडले, लुटीचे काय ?

नोकरीची आमिषे दाखवून फसविण्याची प्रकरणे गोव्यात कमी घडलेली नाहीत. यात सायबर गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच अनेक प्रकरणांत गुन्हेगारांना पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे. परंतु पकडलेल्या गुन्हेगारांकडून त्यांनी केलेली लूट मात्र तक्रारदाराला क्वचितच मिळाली आहे. कारण लुटलेल्या पैशांचे संशयितांकडून अशी व्यवस्था लावलेली असते की, ती पुन्हा वसूल करणे तपास एजन्सींनाही शक्य नसते आणि ते काम नंतर तपास एजन्सीपेक्षा न्यायालयीन काम अधिक ठरते. पोलिस तपासादरम्यान पैसे खर्च केले गेल्याचेच संशयितांकडून सांगण्यात येते. तसेच त्यांच्या वैयक्तिक खात्यात पैसे जमा केले जात नाहीत.

 

Web Title: 13 lakh cheated by luring jobs abroad Suspect arrested from ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा