विजय केंकरेंच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय कृतीदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 10:01 AM2024-09-28T10:01:30+5:302024-09-28T10:02:29+5:30
कला अकादमीच्या नूतनीकरण कामाचा घेणार आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेऊन सूचना, शिफारशींचा अहवाल सरकारला सादर करण्यासाठी नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय कृतीदल सरकारने स्थापन केले आहे. यासंबंधीचा आदेश काल, शुक्रवारी काढण्यात आला.
कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरणाच्या कामावरुन कलाकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या कामात घोटाळा झाल्याचा आरोपही केला जात होता. ध्वनी यंत्रणा व लाइट व्यवस्था सदोष असल्याची टीका केली जात होती. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मागच्या खुर्चीवर बसल्यास आवाज नीट ऐकू येत नाही तसेच रंगमंचावर स्पॉट लाइट व इतर यंत्रणा सदोष असल्याची टीका केली जात होती. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कलाकारांचेच कृती दल स्थापन करुन त्यांच्याकडून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी सूचना, शिफारशींचा अहवाल घेण्याचे ठरवले. त्यानुसार केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतिदल स्थापन केले.
आयएएस अधिकारी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेंकर हे नोडल अधिकारी आहेत. समितीवरील सदस्यांमध्ये तोमाझिन कार्दोझ, विल्यम फर्नांडिस, प्रवीण गांवकर, सतीश गांवस, कला राखण मांडचे देविदास आमोणकर व फ्रान्सिस कुएलो, चार्लस कुरय्या फाउंडेशनचा प्रतिनीधी, गोवा सरकारचे मुख्य आर्किटेक्ट, कला व संस्कृती खात्याचे संचालक, कला अकादमीचे सदस्य सचिव, मनोरंजन संस्थेच्या सदस्य सचिव मृणाल वाळके व बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे हे सदस्य आहेत.
दरम्यान, या समितीच्या नियुक्तीने आता कला अकादमीच्या नूतनीकरणादरम्यान केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यातील त्रुटी, उपाय योजना यांचा सविस्तर अहवाल सादर केला जाईल.
तियात्र अकादमीवर सदस्य नियुक्त
दरम्यान, अन्य एका आदेशाद्वारे तियात्र अकादमीवर सदस्य म्हणून अॅन्थनी बार्बोझा, आयव्हीस तावारिस, मिनीन फर्नाडिस, विल्यम फर्नाडिस, आंतोनियो फिलिप रॉड्रिग्स, ज्यो डिसोझा व मारियो द सुकूर रिबेलो यांची नियुक्ती केली आहे.