गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:08 AM2021-05-15T09:08:08+5:302021-05-15T09:08:15+5:30
११ मे रोजी गोमेकॉमध्ये ऑक्सिजनअभावी २६ रुग्ण दगावले. १३ रोजी पहाटे याच कारणामुळे १५ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. येथील मृत्यूसत्र थांबत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
पणजी : येथील बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) आणखी १३ कोविड रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे दोन ते सहा या वेळेत हे मृत्यू झाले. ऑक्सिजन पुरवठ्याचा घोळ संपुष्टात आणण्यात सरकारला अपयश येत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या इस्पितळात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २७ रुग्ण दगावले. यातील सगळे ऑक्सिजनअभावी मरण पावलेले नाहीत.
११ मे रोजी गोमेकॉमध्ये ऑक्सिजनअभावी २६ रुग्ण दगावले. १३ रोजी पहाटे याच कारणामुळे १५ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. येथील मृत्यूसत्र थांबत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, काँग्रेसचे केंद्रीय नेते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी ट्वीट केले व गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांची हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी केली. दिवसाढवळ्या कोरोनाबाधितांचे खूनच होत असल्यासारखी गोव्यात स्थिती आहे, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
भीतीचे वातावरण
गोव्यातील विविध इस्पितळांमध्ये कोरोनामुळे दररोज ६० ते ७० जणांचे मृत्यू ओढवत आहेत. तेरा महिन्यांत राज्यात सुमारे दोन हजार जणांचे कोरोनाने बळी घेतले. त्यात गोमॅकॉत सुरु असलेल्या मृत्यूसत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.