मारहाण, भ्रष्टाचार, बेशिस्तीमुळे गोव्यातील 13 पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 07:17 PM2018-11-29T19:17:07+5:302018-11-29T19:25:05+5:30
11 महिन्यात 5 वेगवेगळ्या घटनांमध्ये निलंबन
-सुशांत कुंकळयेकर
मडगाव: बेतूल युवक मारहाण प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह एकूण पाच जणांना सेवेतून निलंबित केल्यामुळे गोवापोलिसांमधील बेशिस्त हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास आतापर्यंत पाच वेगवेगळ्या प्रकरणात दोन उपनिरीक्षकांसह एकूण 13 पोलिसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यावरुन एकूणच पोलीस सेवेत असलेल्या त्रुटी भरुन काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपाययोजना हाती घ्यावी लागणार आहे.
1 जानेवारी ते 28 नोव्हेंबर 2018 या कालावधीत गोव्यात निलंबित झालेल्या पोलिसांमध्ये दोन उपनिरीक्षक, एक हवालदार आणि दहा पोलीस शिपायांचा समावेश आहे. याशिवाय अशाच मारहाणीच्या घटनांमध्ये तीन पोलीस उपनिरीक्षकांसह एकूण पाच पोलिसांची खात्यांतर्गत चौकशी सुरु झाली आहे. अशा पोलिसांना आवश्यक ते प्रशिक्षण मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया खुद्द गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनीच व्यक्त केल्याने गोवा पोलिसांची एकंदर स्थिती काय आहे त्यावरही उजेड पडला आहे.
आतार्पयत ज्या पाच प्रकरणात 13 पोलीस निलंबित झाले आहेत. त्यापैकी एक प्रकरण मारहाणीचे असून त्यात कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश वेळीपसह अन्य चार पोलीस शिपायांचा समावेश आहे. या पोलिसांनी बेतुल येथील क्लिन्ट रिबेलो या युवकाला चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली होती. या प्रकरणात आपला हात नसल्याचा दावा या पोलिसांनी केला असला, तरी ज्या असोळणा पोलीस चौकीवर हा मारहाणीचा प्रकार घडला तेथे तपास केल्यावर तपास अधिकाऱ्यांना चामडी पट्टा सापडला होता.
अन्य घटनांमध्ये दोन घटना लाचखोरीशी संबंधित असून या दोन घटनांत एका उपनिरीक्षकासह एक हवालदार आणि दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले होते. या दोन्ही घटना ऑगस्ट महिन्यात घडल्या होत्या. त्यापैकी एक घटना वाळपई व डिचोली पोलीस स्थानकांशी संबंधित असून एका व्यक्तीकडे एका प्रकरणाची वासालात लावण्यासाठी दहा हजाराची लाच मागितल्याच्या संशयावरुन वाळपईचे उपनिरीक्षक आनंद नार्वेकर तर डिचोलीचा पोलीस शिपाई सचीन नाईक या दोघांना निलंबित केले होते.
दुसरी घटना 18 ऑक्टोबर रोजी वास्को पोलीस स्थानकावर घडली होती. अशाच एका लाचखोरीच्या आरोपावरुन वास्कोचा हवालदार तुकाराम शिरोडकर व पोलीस शिपाई प्रेम जाधव या दोघांना निलंबित करण्यात आले होते. निलंबित हवालदार शिरोडकर याच्याविरोधात नंतर आणखी एका व्यक्तीने आपल्याकडूनही लाच मागण्यात आली होती अशी तक्रार दिली होती.
अन्य दोन घटना मडगाव पोलीस स्थानकाशी संबंधित असून त्यापैकी एका प्रकरणात कैदी हातातून निसटला म्हणून तीन पोलीस शिपायांना तर दुसऱ्या प्रकरणात दारु पिऊन वाहन चालविण्याच्या आरोपावरुन एका शिपायाला निलंबित करण्यात आले होते. येथील एक घटना 23 जुलै रोजी घडली होती. मडगाव पोलीस स्थानकाचा पोलीस शिपाई असलेल्या विष्णू नाईक याने दारु पिलेल्या अवस्थेत पोलिसांची जीप दुसऱ्या एका वाहनावर ठोकली होती. दुसरी घटना 4 ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेत पॉल चिमा या घरफोडी प्रकरणात अटक केलेल्या संशयिताला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळाला होता. या प्रकरणात एकूण तीन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले होते.
जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यात गोव्यात वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 55 सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कारणांवरुन निलंबित केल्याची माहिती हाती लागली असून त्यात डॉक्टर, तुरुंग अधिकारी आणि गोवा डेअरीच्या कर्मचा:यांचा समावेश होता. यातील काही जणांना सेवेतील हलगर्जीपणामुळे तर काहीजणांना लाचखोरीशी संबंध असल्याने निलंबित करण्यात आले होते.
या एकंदर स्थितीचा आढावा घेताना दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष आंतोनियो क्लोरिश यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समर्पक अशीच आहे. ते म्हणाले, 'सरकारी नोकरांना आणि विशेष करुन पोलिसांना कायद्याची कुठलीच भीती न राहिल्यामुळे असे प्रकार वारंवार घडतात. वास्तविक अशा कर्मचाऱ्यांवर आणि पोलिसांवर त्वरित एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे. मात्र अद्याप अशा प्रकारची कारवाई कुणावरही केलेली नाही.' पोलिसांना आपण कितीही दादागिरी केली तर केवळ आपल्याला निलंबित केले जाईल व कालांतराने पुन्हा आपल्याला सेवेत घेतले जाईल याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच ते अशाप्रकारे वागण्यास धजावतात असेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत पोलिसांनी मारहाण केल्याच्या तीन तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक प्रकरण सध्या गाजत असलेल्या क्लीन्ट रिबेलो मारहाणीचे आहे. दुसरे प्रकरण काही दिवसांपूर्वी फातोर्डा फुटबॉल मैदानावर मारहाण करण्यात आलेल्या लेस्टर डिसोझा याचे आहे. तर तिसरे प्रकरण नेत्रवळी-सांगे येथील अमित नाईक याने आपल्याला सांगे पोलिसांकडून मारहाण केल्याची तक्रार केल्याचे आहे. यासबंधी क्लॉविश म्हणाले, अशाप्रकारचे गुन्हे जर सामान्य माणसाने केले असते तर पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन त्यांना अटक केली असती. मात्र सामान्य लोकांना जो न्याय लागतो तोच पोलिसांना का लागत नाही असा सवाल त्यांनी केला.
ज्येष्ठ पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, प्रत्येक घटनेचे कारण समजून घेतल्याशिवाय अशा प्रकरणात सरसकट प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. मात्र कुठल्याही पोलिसाकडून जर कुठल्याही व्यक्तीला मारहाण झाली, तर तो प्रकार निश्चितच समर्थनीय नाही. अशा प्रकारच्या घटना कशा हाताळायच्या असतात याचे प्रशिक्षण कदाचित नव्या पोलिसांना देण्याची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर पोलीस तणावाखाली असल्यास तो तणाव दूर कसा करावा यासाठीही त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असे ते म्हणाले.
लाचखोरीच्या आरोपाखाली उपनिरीक्षक बडतर्फ
2018 साली गोवा पोलीस सेवेत असलेल्या राहुल धामसेकर या उपनिरीक्षकावरचा लाचखोरीचा आरोप सिद्ध झाल्याने बडतर्फीची कारवाई झाली. सदर उपनिरीक्षक फोंडा पोलीस स्थानकाशी संलग्न होता. काही वर्षापूर्वी एका व्यक्तीकडून दहा हजाराची लाच घेण्याच्या आरोपाखाली भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच प्रकरणात त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने यंदा ही कारवाई करण्यात आली.