महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील १३ पर्यटकांना बुडताना वाचवले
By किशोर कुबल | Published: November 28, 2023 12:26 PM2023-11-28T12:26:46+5:302023-11-28T12:28:15+5:30
इफ्फी, जुने गोवें चर्चचे फेस्त तसेच अन्य उत्सवांमुळे गोव्यात वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी
किशोर कुबल/ पणजी
पणजी : इफ्फी, जुने गोवेतील प्रसिध्द चर्चचे येऊ घातलेले फेस्त तसेच अन्य उत्सवांमुळे गोव्यात वीकेंडला पर्यटकांची गर्दी वाढली आहे. येथील किनाऱ्यांवर पर्यटकांची मौजमस्ती चालू असून अनेकदा ती जीवावरही बेतते. गेल्या आठवडाअखेर बुडताना १३ पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले.
महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील पर्यटकांचा यात समावेश होता. गोव्यात आल्यावर अनेकांना समुद्रात उतरण्याचा मोह आवरत नाही. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसल्याने मोठ्या लाटांसोबत पाण्यात ओढले जाऊन प्राण गमावण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळेच २००८ साली गोव्याच्या किनाय्रांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले. मुंबईची दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनी जीवरक्षकांची सेवा देते.
दृष्टी लाइफसेव्हिंगच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली की, हरमल किनाय्रावर विलासपूर, छत्तीसगढमधील चार पुरुषांना जीवरक्षक अमित कोळंबकर आणि उमेश फडते यांनी जेट स्कीच्या साहाय्याने मदतकार्य करीत वाचवले. हैदराबादचा २५ वर्षीय युवक तसेच राजस्थानचा २३ वर्षीय युवक या दोघांनाही याच किनाय्रावर बुडताना वाचवले. दोघेही पोहताना प्रचंड प्रवाहात अडकले, जेव्हा दृष्टी सागरी जीवरक्षक प्रीतेश कुबल, चेतन बांदेकर आणि नवनाथ घाटवळ यांनी रेस्क्यू बोर्ड, रेस्क्यू ट्यूब आणि जेट स्की घेऊन त्यांना वाचवले.
बागा समुद्रकिनाऱ्यावर, कर्नाटक आणि पुणे येथील २२ ते २६ वर्षीय वयोगटातील पाचजणांना जीवरक्षक फोंडू गावस, उमेश मडकईकर, दिवाकर देसाई, साईनाथ गावस आणि मंथा किनळकर यांनी बचाव कार्यात वाचवले. यापैकी एक बुडू लागला होता त्याला वाचवण्यासाठी अन्य चार मित्रांनी प्रयत्न केला असता तेही प्रवाहात अडकले. जीवरक्षकांनी पाचहीजणांना सुखरूप परत किनाऱ्यावर आणले व प्रथमोपचार दिले.
मांद्रे बीचवर एकाला, कलंगुट बीचवर ३६ वर्षीय रशियन महिलेला तसेच २१ वर्षीय बंगळुरुच्या युवकाला प्रवाहात सापडले असता जीवरक्षक रोहित हिरनाईक आणि दर्पण रेवांका यांनी वाचवले. दरम्यान, आणखी एका घटनेत कळंगुट आणि बागा बीचवर गर्दीत हरवलेली दोन मुले, मध्य प्रदेशातील चार वर्षांची मुलगी आणि मुंबईतील एक मूल जीवरक्षकांनी शोधून काढून पालकांच्या स्वाधिन केले.