बापरे! या वर्षात मुरगाव तालुक्यात १३२५ जणांना कुत्र्यांचा चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 08:29 PM2019-12-27T20:29:17+5:302019-12-27T20:30:04+5:30
कुत्रा आडवा आल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही मोठे आहे.
वास्को: कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम सुरु असतानाही राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ही मोहीम फसल्यात जमा आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यात असलेल्या चिखलीतील सरकारी उपजिल्हा इस्पितळात गेल्या वर्षभरात कुत्र्यांनी चावे घेतलेल्या एकूण १३२५ जणांवर उपचार करण्यात आले. रुग्णांची ही संख्या धक्कादायक असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
वास्को शहर तसेच जवळपासच्या भागात मागच्या काही काळात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. त्यामुळे कुत्रे चावण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच कुत्रा आडवा आल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही मोठे आहे.
वर्षभरात कुत्र्यांनी चावा घेतलेले १३२५ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर चिखली उपजिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांना संपर्क केलाअसता, त्यांनीही कुत्रे चावा घेण्याच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, चिखली जिल्हा इस्पितळात या रुग्णांवर योग्य उपचार झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पुरेसा औषधसाठा असल्याचेही त्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी मुरगाव पालिका ‘पिपल फॉर अॅनिमल’ संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम राबवत आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत एकूण ४०५ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहिती मुरगाव नगरपालिकेचे मुख्यधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी दिली.
निर्बिजीकरण मोहिमेबाबत संशय
निर्बिजीकरण मोहीम राबवूनही कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने लोक या मोहिमेबाबत संशय व्यक्त करीत आहेत. एका मुरगाव पालिका क्षेत्रात हजारो भटके कुत्रे असताना वर्षभरात फक्त ४०५ कुत्र्यांचे निर्बिजीकरण हे प्रमाण खूपच कमी आहे. पालिकेने ही मोहीम तीव्र करणे आवश्यक आहे.
ओला कचरा प्रमुख कारण
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यास उघडयावर फेकण्यात येणारा वा साठवण्यात येणारा ओला कचरा हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. ‘ब्लॅकस्पॉट’ हे कुत्र्यांचे हक्काचे अड्डे ठरत आहेत. तसेच पालिकेच्या कचरा कुंडया तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पही भटक्या कुत्र्यांचे हक्काचे घर आहे.
दर महिन्याला शंभरपेक्षा जास्त रुग्ण
दक्षीण गोव्यातील मुरगाव तालुक्यात असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात मागच्या एका वर्षात १३२५ जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. दर महिन्याला शंभरपेक्षा जास्त रुग्णांवर येथे उपचार झाले आहेत. या इस्पितळातून मिळालेल्या आकडेवारीनुसार...
महिना रुग्णांची संख्या
जानेवारी १०८
फेब्रुवारी ११६
मार्च ११८
एप्रिल १२२
मे १२९
जून १२७
जुलै १२७
आॅगस्ट ११०
सप्टेंबर ९९
आॅक्टोबर १२४
नोव्हेंबर १०८
डिसेंबर ३७ (१५ डिसेंबर पर्यंत)