उत्तर गोव्यातील हणजूण येथून १.३३ लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 09:37 PM2017-10-07T21:37:50+5:302017-10-07T21:38:23+5:30
उत्तर गोव्यातील किनारी भागात हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत ओडिसाच्या युवकास अमली पदार्थ कायद्याखाली अटक केली.
म्हपसा - उत्तर गोव्यातील किनारी भागात हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत ओडिसाच्या युवकास अमली पदार्थ कायद्याखाली अटक केली. त्याच्याकडून अंदाजे १.३३ लाख रुपये किंमतीचा गांजा अमली पदार्थ जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार हणजूण पोलीस उपनिरीक्षक हरिष वायंगणकर दि. ७ रोजी पहाटे गस्तीवर असताना संतोष अब्राहम मोंडल (२९) रा. हणजूण मुळ ओडिसा हा युवक हणजूण येथील लागूना हॉटेलच्या जवळील रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन संशयावरून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे निळ्या रंगाच्या पिशवीत १ किलो ३३० ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सापडला.
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १ लाख ३३ हजार होत असून संतोष मोंडल याचे विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संदेश मोंडल यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली